स्कूटरवर नमकीन विकणाऱ्याने उभारली कोट्यवधींची कंपनी; वाचा सुब्रत रॉय यांचा प्रेरणादायी प्रवास

मुंबई : सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे प्रदीर्घ आजारानंतर मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. त्यांनी ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मागील बऱ्याच दिवसांपासून मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांचे पार्थिव लखनऊमधील सहारा शहरात आणले जाणार असून, तिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. सुब्रतो रॉय सहारा यांचा जन्म १० जून १९४८ रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते.

बिहारमध्ये जन्मलेल्या सुब्रत रॉय यांनी गोरखपूर येथील सरकारी कॉलेजमधून मॅकॅनिकल इंजीनियरिंग पूर्ण केली. सुरूवातीच्या काळात रॉय हे त्यांच्या मित्रांसोबत स्कूटरवरून नमकीन विकाचे. १९७६ रोजी गोरखपूर येथून त्यांनी व्यावसायाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर चिटफंड कंपनी सहारा फायनान्स ही कंपनीला वाढवण्याचं काम केलं. १९७८ पर्यंत त्यांनी सहारा इंडिया नावाचा परिवार उभा केला. पुढे सहारा इंडिया हा देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहापैकी एक बनला.

समूहाने १९९२ मध्ये हिंदी वृत्तपत्र राष्ट्रीय सहारा लाँच केलं. १९९० च्या दशकच्या शेवटी पुण्याजवळ एम्बी व्हॅली सिटी प्रोजेक्ट सुरू केला. तसेच सहारा टीव्हीच्या माध्यमातून टेलीव्हिजन क्षेत्रात देखील पाय ठेवला. २००० च्या दशकात सहाराने लंडनच्या ग्रोसवेनर हाउस हॉटेल आणि न्यूयॉर्क शहरातील प्लाजा हॉटेल सारख्या प्रॉपर्टी विकत घेतल्या आणि सहाराचा डंका जगभर पसरला.

सुब्रत रॉय यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानही मिळाले आहेत. ईस्ट लंडन विद्यापीठाकडून बिझनेस लिडरशीपमध्ये मानद डॉक्टरेट आणि लंडनमधील पॉवरब्रँड्स हॉल ऑफ फेम अवॉर्ड्समध्ये बिझनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार त्यांना देण्यात आला. भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा बराच काळ समावेश राहिला.

२०१४ मध्ये अनेक कायदेशीर खटल्यांमुळे रॉय यांना अटक करण्यात आली होती. तिहार तुरुंगात असताना त्यांनी सेबीशी दीर्घ कायदेशीर लढा दिला. अटकेनंतर दोन वर्षांनी त्यांची पॅरोलवर सुटका झाली. अनेक वर्षांपासून लोकांचे पैसे न दिल्याने सहारा इंडियाविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. लोकांनी हे पैसे कंपनीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवले होते.

मात्र नंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सहाराश्रींना मोठा दिलासा मिळाला. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशावर तात्काळ सुनावणी करून स्थगिती दिली होती. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाईबाबत स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सुब्रतो रॉय यांच्यावरही असाच एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ते सध्या जामिनावर बाहेर होते.