भुसावळ : दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणातून खुन्नस ठेवून शहरातील शरीर सौष्ठवपटू अफाफ अख्तर पटेल (30, डॉ.झोपे यांच्या दवाखान्याजवळ, भुसावळ) याच्यावर शनिवार, 4 फेब्रुवारी 20223 रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता व उपचारादरम्यान बुधवार, 8 फेब्रुवारी रोजी तरुणाची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यातील दोन पसार आरोपींना सुरतच्या उमरवाडा भागातून बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. शेख उबेद शेख अक्रम (रा.मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) व शेख अबूजर शेख बसीर (रा.जाम मोहल्ला, भुसावळ) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. संशयीताना गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
जुन्या वादातून केला होता हल्ला
खडका रोडवरील अलिया कोल्डींक्सच्या दुकानात अफाक पटेल हा तरुण बसला असताना त्याच्यावर दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाची खुन्नस ठेवून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींची धरपकड सुरू केली मात्र संशयित पसार झाले होते. दोन संशयित सुरतमध्ये असल्याची माहिती बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाल्यानंतर उमरवाडा व बेस्तान भागात पथकाने संशयितांचा शोध घेतला असता मंगळवारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने उमरवाडा भागातून दोघांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, हवालदार सुनील जोशी, हवालदार विजय नेरकर, नाईक उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, जावेद शहा, प्रशांत सोनार, सचिन पोळ, अतुल कुमावत, सागर वंजारी, कैलास ठाकूर आदींच्या पथकाने केली.