अजिंठा, वेरुळचा उल्लेख करत सुधा मूर्तींची संसदेत मोठी मागणी; वाचा काय म्हणाल्या…

नवी दिल्ली : खासदार सुधा मूर्ती यांनी पहिल्यांदाच २ जुलै रोजी राज्यसभेत भाषण केलं. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहिल्या भाषणात त्यांनी महिलासंबंधित समस्या आणि पर्यटनाबाबत त्यांचं मत सभागृहासमोर मांडलं. त्यांच्या या पहिल्याच भाषणातील त्यांच्या दोन्ही मागण्यांमुळे सोशल मीडियावर त्यांची प्रचंड चर्चा सुरु आहे.

सुधा मूर्ती यांनी सुरुवातीला महिलांच्या आरोग्यसंबंधी विषय मांडला. गेल्या काही वर्षात महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे महिलांच्या मृत्यूदरातही वाढ झाली आहे. महिलांना या गर्भशयाच्या कर्करोगापासून प्रतिबंधित करायचं असेल तर पाश्चात्य देशात एक लस तयार झाली आहे. या लसीबाबत सुधा मूर्ती यांनी सभागृहाला माहिती दिली. हे लसीकरण फार महाग नाही. भविष्यात याचा मुलींना नक्कीच चांगला फायदा होईल, असंही त्यांनी अधोरेखित केलं.

तसंच, त्यांनी देशांतर्गत पर्यटनावरही सुधा मूर्ती यांनी त्यांचं मत मांडलं. त्या म्हणाल्या, “भारतात ५७ देशांतर्गत पर्यटन स्थळे आहेत, ज्यांचा जागतिक वारसा स्थळ म्हणून विचार केला पाहिजे. यामध्ये कर्नाटकातील श्रवणबेला गोला येथील बाहुबली मूर्ती, लिंगराजाचे मंदिर, त्रिपुरातील उनाकोटी खडकावरील कोरीव काम, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, मितावली येथील चौसठ योगिनी मंदिर, गुजरातमधील लोथल, गोल गुंबड इत्यादींचा समावेश आहे.”

“भारतात ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत. परंतु ५७ स्थळांनाही हा दर्जा दिला जाऊ शकतो. आपण त्या ५७ स्थळांची काळजी घेतली पाहिजे”, असं मूर्ती म्हणाले. त्या पुढे म्हणाल्या, “श्रीरंगममधील मंदिरे अप्रतिम आहेत. २५०० वर्षे जुने असलेले सारनाथच्या जुन्या स्मारकांचा समूह अजूनही जागतिक वारसा स्थळांमध्ये नाहीत. मध्य प्रदेशातील मितावली येथील हजारो वर्षे जुन्या चौसठ योगिनी मंदिरातून जुन्या संसद भवनाच्या डिझाइनचे प्रोटोटाइपिंग करण्यात आले आहे.” यावेळी त्यांनी अजिंठा व वेरुळचा देखील उल्लेख केला.