सुधीर मुनगंटीवार यांना नकोय लोकसभेचे तिकिट; वाचा काय म्हणाले…

मुंबई : लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. अनेकजण दिल्ली वाऱ्या करत आहेत. मात्र भाजपानेते सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या तिकिटासंदर्भात मोठं विधान केलं आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. लोकसभेसाठी चंद्रपूरमधून महायुतीकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र आपल्याला तिकीट मिळू नये, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये लोकसभेत जाण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. “मला तिकीट कोणत्याही परिस्थितीत मिळू नये याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय. शेवटी यश-अपयश परमेश्वराच्या हाती आहे. माझी इच्छा लोकसभेत जाण्याची नाही हे नक्की आहे. पण पक्षानं आदेश दिला तर त्यानुसार वागणं हे कार्यकर्ता म्हणून आमचं कर्तव्यच आहे”, असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पक्षानं आजपर्यंत या पदापर्यंत मला पोहोचवलं. राज्याच्या सेवेची संधी दिली. पण मी लोकसभेचं तिकीट नको असं म्हणतोय”. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपुरात केलेली विकासकामेही सांगितली.  मुनगंटीवार यांच्या या भुमिकेमुळे राजकीय वर्तूळात आर्श्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान आज किंवा उद्या भाजपाची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यात मुनगंटीवार यांचे नाव असते की नाही ? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.