प्लॉट फसवणूक प्रकरण : मंत्रालयात महिलेची आत्महत्या, वकीलासह एका अधिकार्‍यांविरोधात गुन्हा

धुळे : पतीच्या नावे एमआयडीसीत असलेली जागा हडप केल्याचा आरोप करीत धुळ्यातील 46 वर्षीय शीतल गादेकर यांनी कीटकनाशक प्राशन करीत मंत्रालयासमोर आत्महत्या केली होती. तत्पूर्वी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर जे.जे.रुग्णालयात या महिलेचा मंगळवारी मृत्यू ओढवला होता. या घटनेनंतर झोपी गेलेले प्रशासन खाडकन जागे झाले असून महिलेच्या फसवणूकप्रकरणी धुळ्यातील वकील अ‍ॅड.नरेशकुमार मानकचंद मुणोत (धुळे) यांच्यासह एमआयडीसीतील अधिकारी-कर्मचार्‍यांविरोधात तक्रार अर्जावरून मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

असे आहे नेमके प्रकरण
मयत शीतल गादेकर यांच्या पतीच्या नावे एमआयडीसीत प्लॉट नं. पी.16 हा होता मात्र अर्जदार यांच्या पतीसोबत व्यवसाय निमित्ताने पुणे येथे रहात असतांना गैरअर्जदार नरेशकुमार मानकचंद मुणोत यांनी तत्कालीन एमआयडीसी अधिकार्‍यांसोबत आर्थिक संगणमत करून बोगस व खोटी नोटरी बनवून पतीच्या नावे असलेला प्लॉट जबरदस्तीने हडपल्याचा आरोप महिलेने केला होता शिवाय खरेदी खताऐवजी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करून बेकायदेशीररीत्या प्लॉटचे हस्तांतरण करण्यात आले. नोटरी पेपरवर तिच्या पतीचे नावे खोट्या सह्या तसेच पतीच्या छायाचित्राचा गैरवापर करीत बनावट इसम उभा करीत या प्लॉटचे हस्तांतरण करून फसवणूक केल्याचा आरोप महिलेने करीत न्याय देण्याची मागणी मंत्रालयातील प्रधान गृह सचिवांसह पोलिस प्रशासनाकडे केली होती. 2020 पासून पाठपुरावा केल्यानंतरही न्याय न मिळाल्याने कीटकनाशक प्राशन करीत महिलेने मंगळवारी आत्महत्या केली.

अखेर दाखल झाला गुन्हा
मयत शीतल गादेकर यांच्या आत्महत्येनंतर खळबळबडून जागे झालेल्या प्रशासनाने या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्यानंतर मंगळवारी रात्री अ‍ॅड.नरेशकुमार मानकचंद मुणोत यांच्यासह एमआयडीसीतील अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे निरीखक हेमंतकुमार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

अ‍ॅड.मुणोत यांची दिवसभर चौकशी
प्लॉट फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बुधवारी अ‍ॅड.मुणोत यांना धुळे गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीकामी बोलावण्यात आले. निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी मुणोत यांच्याकडे असलेल्या सर्व कागदपत्रांची बारकाईने चौकशी केली तसेच आतापर्यंत घडलेला प्रकार जाणून घेतला. दिवसभर ही चौकशी सुरूच होती. निरीक्षक पाटील म्हणाले की, अ‍ॅड.मुणोत यांची चौकशी करण्यात आली तसेच लवकरच एमआयडीसीच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची चौकशी करून निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल. अद्याप एमआयडीसीतील अधिकार्‍यांची नावे निष्पन्न झाली नसलीतरी चौकशीत लवकरच नावे निष्पन्न होवून पोलिस प्रशासन आपली कारवाई करेल.