Sunil Tatkare : संजय राऊतांचा घेतला खरपूस समाचार, म्हणाले “जामीनावर सुटलेल्यांनी…”

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘सिंचनदादा’ असा उल्लेख केला होता. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला आहे.
यावेळी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ज्या अजित पवारांचा उल्लेख संजय राऊत ‘सिंचनदादा’ म्हणून करतात त्या अजितदादांशिवाय महाविकास आघाडीचे सरकार चालू शकत नाही अशी संजय राऊतांची तेव्हा ठाम समजूत होती, असे ते म्हणाले आहेत.
सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातील काही प्रश्नासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीला जाऊन भेट घेतली होती.
मात्र, तिकडून परत आल्यानंतर संजय राऊतांचा सतत चार पाच दिवस माझ्याकडे आग्रह होता. त्यावेळी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची भावना आम्हाला कळवली होती. उद्धवजींच्या मनात विचलता निर्माण झाली असून पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन करावे असे त्यांच्या मनात येत असल्याचे तेव्हा संजय राऊत म्हणाले होते.
त्यावेळी एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. तसेच संजय राऊत तुम्ही आरोपी असून तुम्ही जामिनावर बाहेर आला आहात त्यामुळे ज्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशी टीका सुनील तटकरे यांनी राऊतांवर केली आहे.