पाठिंबा आणि पाठलाग!

दिल्ली दिनांक

– रवींद्र दाणी

लेफ्ट. जनरल हामिद गुल हे पाकिस्तानच्या आयएसआयचे प्रमुख होते. चांगले दबंग प्रमुख होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका भारतीय पत्रकाराला म्हटले होते, ‘‘1947 च्या विभाजनात अर्धा पंजाब भारतात गेला याचे मला दु:ख आहे. संपूर्ण पंजाब प्रांत पाकिस्तानला मिळावयास हवा होता. शीख समाजाचे खरे स्थान पाकिस्तानात आहे.’’

आणि भारतीयांचे दु:ख म्हणजे पंजाब विभागला गेला. किमान लाहोरसह सारा पंजाब भारतात असावयास हवा होता. कारण, याच लाहोरमध्ये 26 जानेवारी 1930 रोजी मध्यरात्री तिरंगा फडकावीत जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. पंजाबमध्ये 40-45 वर्षांपूर्वी झालेला दहशतवाद आणि आज सुरू असलेले अमृतपाल प्रकरण यामागे कोणत्या शक्ती आहेत याची कल्पना हामिद गुल यांच्या भूमिकेवरून करता येईल.

पाठिंबा आणि पाठलाग!

दरम्यान, खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या बाबतीत पाठिंबा व पाठलाग या दोन्ही बाबी एकाच वेळी होत आहेत. उत्तर भारतातील अनेक राज्यांचे पोलिस-गुप्तचर संस्था अमृतपालचा शोध घेत आहेत तर त्याचवेळी न्यू यॉर्कच्या जगप्रसिद्ध टाईम स्क्वेअरवर भिंद्रानवाले आणि अमृतपाल यांची मोठी मोठी छायाचित्रे रूपेरी पडद्यावर झळकत आहेत. त्यात भर म्हणजे अमृतपालच्या समर्थनार्थ एक मोठी कार रॅली न्यू यॉर्कमध्ये काढण्यात आली. रिचमंड हिल भागातील बाबा मखान शाह लुबाना शीख सेंटरपासून निघालेली ही मोटार रॅली न्यू यॉर्कच्या मॅनहटन भागातील टाईम स्क्वेअर भागात जाऊन विसर्जित झाली. यात खलिस्तानी झेंडे हाती घेत शीख समाजाचे हजारो लोक सहभागी झाले होते.

भारताचा विरोध

भारत सरकारने याबाबत आपला प्रखर विरोध बायडन प्रशासनाकडे नोंदविला असला तरी जोपयर्ंंत आंदोलक आमच्या कायद्याचे उल्लंघन करीत नाहीत, त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई आम्हाला करता येणार नाही असे बायडन प्रशासनाने भारत सरकारला कळविले आहे. न्यू यॉर्कमध्ये शीख समुदाय मोठ्या संख्येत आहे. प्रश्न आहे अचानक हा समुदाय खलिस्तान समर्थक कसा झाला? शीख समाजात याबाबत खलबते सुरू होती तर याबाबत तेथील भारतीय अधिकार्‍यांनी भारत सरकारला अगोदरच कळवावयास हवे होते. जेणेकरून भारत सरकारला याबाबत त्यांच्याशी चर्चा करून त्याच्या मनातील गैरसमज दूर करता आले असते. न्यू यॉर्कमध्ये घडणार्‍या घटनांकडे सार्‍या जगाचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे खलिस्तानी समर्थकांनी मोठी कार रॅली काढणे योग्य घटना मानली जात नाही. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशांमध्येही खलिस्तानी समर्थकांनी अमृतपालला उघड पाठिंबा दिला आहे. भारताने याबाबतही आपला विरोध नोंदविला आहे.

अकाल तख्तचा इशारा

इकडे पंजाबमध्ये सुवर्ण मंदिरातील अकाल तख्तने अमृतपालला पाठिंबा घोषित केला आहे.अमृतपालच्या ज्या समर्थकांची धरपकड करण्यात आली आहे, त्या सर्वांची 24 तासांत सुटका करण्यात यावी, असेही अकाल तख्तचे मुख्य जत्थेदार ग्यानी हरप्रीतसिंग यांनी म्हटले होते. अकाल तख्तचा प्रभाव म्हणजे ग्यानी हरप्रीतसिंग यांनी ज्या 360 लोकांच्या सुटकेची मागणी केली होती, त्यातील 348 जणांची पंजाब सरकारने सुटका केली आहे. पंजाब सरकारने अकाल तख्तसमोर झुकण्याची ही जी भूमिका घेतली आहे, ती गंभीर आहे. पण, ती नवी नाही. पंजाबात कोणतेही सरकार असो, अकाल तख्तशी टक्कर घेण्याचे साहस कुणीही केलेले नाही. अकाल तख्त हे शीख समाजाच्या आदेशाचे सर्वोच्च व्यासपीठ मानले जाते.

पंजाब सरकारने अकाल त‘तसमोर शरणागती पत्करण्याचा हा जो निर्णय घेतला आहे, त्याचे दूरगामी परिणाम होतील. सर्वात मोठा परिणाम पंजाब पोलिसांच्या मनोधैर्यावर होईल. खलिस्तानी समर्थकांना पकडण्याची त्यांची इच्छाशक्ती संपुष्टात येईल. उद्या अमृतपालला पकडण्यात पंजाब सरकारला यश आले तरी अकाल तख्त त्याच्या सुटकेची मागणी करणार आणि पंजाब सरकारला पुन्हा एकदा अकाल त‘तसमोर शरणागती पत्करावी लागणार. पंजाब हाताळण्याची कुवत आणि धमक राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये नाही.

पोलिसांचा पाठिंबा?

पंजाब पोलिसमधील एखादा गट अमृतपालला पाठिंबा देत असल्याचे केंद्र सरकारला वाटत आहे. अमृतपाल ज्या पद्धतीने वारंवार पोलिसांना चकमा देत आहे यावरून हा निष्कर्ष काढला जात आहे. अमृतपालने आतापर्यंत हरयाणा, दिल्ली या दोन राज्यांतील पोलिसांना चुकवून पुन्हा पंजाब गाठल्याचे सांगितले जाते. अमृतपालला पाकिस्तानच्या आयएसआयचा पाठिंबा असल्याचे म्हटले जाते. तरी अमृतपाल पाकिस्तानला जाणार नाही. आयएसआय तेवढी हुशार आहे. तो नेपाळला गेला असल्याची एक शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास अमृतपालला लंडन-न्यू यॉर्क गाठणे सोपे जाणार आहे. आणि एकदा का अमृतपाल लंडन- न्यू यॉर्कला पोहोचला तर मग त्याला भारतात आणणे फार अवघड काम ठरणार आहे.

नीरव मोदी, विजय माल्या यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकार जोरदार प्रयत्न करीत आहे. काही वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यात सरकारला यश येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मेहुल चौकसी हा डोमनिका या लहान देशात ठाण मांडून बसला आहे. चौकसीला भारतात आणण्याचा एक जोरदार प्रयत्न भारत सरकारने केला होता. त्याला आणण्यासाठी विमानही पाठविण्यात आले होते. पण, कायदेशीर लढाईत ते शक्य झाले नाही. चौकसी येणार असे वाटत असताना त्याला भारतात आणता आले नाही.

अमृतपालचा व्हिडीओ

दरम्यान अमृतपाल सिंगने एक व्हिडीओ जारी केला असून, आपल्याला अटकेची कोणतीही भीती नसल्याचे त्याने म्हटले आहे. आपण एकदम तंदुरुस्त आहोत, आपले मनोधर्य उंचावलेले आहे असेही त्याने यात म्हटले आहे. 13 एप्रिल रोजी बैसाखीच्या दिवशी सुवर्ण मंदिरात शीख धर्मगुरूंची बैठक व्हावी व त्यात शीख धर्माविरुद्ध सुरू असलेल्या कथित कारस्थानाचा विचार व्हावा असेही त्याने या संदेशात म्हटले आहे. अमृतपालचा हा व्हिडीओ संदेश खरा की बनावट याचा तपास पोलिस करीत असून, त्यावरून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या तरी अमृतपाल पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे.

एक चांगली घटना

अमृतपालच्या समर्थनार्थ देशात व विदेशात सभा-मेळावे होत असले तरी पंजाबच्या लुधियाना शहरात अमृतपालच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यात शीख समाजाचा पुढाकार होता हे विशेष. अमृतपालमुळे आमच्यावर खलिस्तानी असल्याचा ठप्पा बसत आहे आणि हे आम्हाला मान्य नाही असे म्हणत ही निदर्शने करण्यात आली.

पुन्हा सरबत खालसा

शीख समाजाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणजे सरबत खालसा. 40-45 वर्षांपूर्वी राज्यात दहशतवाद शिगेवर असताना- सरबत खालसा प्रकरण बरेच गाजत होते. अकाल तख्तसमोर होणार्‍या सरबत खालसात देशविरोधी प्रस्ताव पारित केले जात होते. आता अमृतपाल सिंगने पुन्हा सरबत खालसाची मागणी केली आहे. सरबत खालसा बोलावून शीख समाजाच्या मागण्यांची चर्चा करण्यात यावी असे त्याने म्हटले आहे.अमृतपाल पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी झाल्यास तो 13 एप्रिल रोजी बैसाखीच्या दिवशी सुवर्ण मंदिरात होणार्‍या सरबत खालसात प्रकट होऊ शकतो, असा एक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र आपल्या शरणागतीसाठी त्याने दोन-तीन अटी घातल्या आहेत. पहिली अट म्हणजे पोलिस कोठडीत असताना आपल्याला मारहाण होऊ नये आणि आपली शरणागती अटक दाखविता कामा नये. हे प्रकरण कुठवर जाणार?