नवी दिल्ली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी स्वत:च्याच सरकारला पत्र पाठवलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच त्यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. यावेळी, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण मानत नसल्याचे म्हटले. तसेच, पडळकरांनी अजित पवारांचं नाव घेत, हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असल्याची घणाघाती टीका केली. त्यावरुन, राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली असून आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही थेट भाजपला लक्ष्य केलंय.
आता, सुप्रिया सुळे या वादावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, दुर्दैव एका गोष्टीचं मला वाटतं, अजित दादा हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत, विशेष म्हणजे ते आज भाजपासोबत सत्तेत आहेत. तरीही त्यांचा मित्र पक्ष त्यांच्याबद्दल असं बोलतो. भाजपाने याचं उत्तर द्यायला हवं, तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने अजित पवारांना सत्तेत सोबत घेतलं. मग, ते अजित पवारांचा अपमान करण्यासाठी घेतलं का? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपला विचारला आहे. ही कुठली पद्धत आहे, स्वत:च्या सहकारी पक्षनेतृत्त्वाबद्दल बोलायची, हे दुर्दैवी असून अजित पवारांचा अपमान आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली.
फडणवीसांनी कान टोचले
मला असं वाटतं की, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे, तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशाप्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये, असे माझं स्पष्ट मत आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचले आहेत.