---Advertisement---
जळगाव : माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन 1974 पासून (40 वर्ष) सतत राजकारणात होते. 1980 पासून सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते 34 वर्ष आमदार होते. हिन्दुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रीपद दिले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या केलेल्या कार्याचा आढावा ज्यामध्ये जळगाव शहराचा सर्वांगिण विकास, विशेषत: बीओटी तत्त्वावर बांधलेले संकूल, गोरगरिबांसाठी घरे यावर ते प्रभावित होते. त्यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटविला होता. मग ते जिल्हा बँक असो, दूध विकास, मिनी मंत्रालय असो वा साखर कारखाने असो. त्या काळामध्ये सहकार क्षेत्रात जिल्ह्याचे विकासाचे व्हिजन, शेतकरी व सामान्य जनता हे केंद्रबिन्दु ठेवून त्यांनी काम केलेले होते. सन 2014 पासून प्रकृतिच्या कारणास्तव सुरेशदादा राजकारणातून बाहेर पडले. सर्व समाजातील व्यापारी व उद्योजक तसेच इतर प्रोफेशनल यांच्यामध्येही त्यांच्याबद्दल खूप मोठी आदराची भावना होती व आहे.
दि. 8 मे 2024 रोजी सुरेशदादा जैन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला व आयुष्याच्या उर्वरित प्रवासात सक्रीय राजकारणात कोणताही सहभाग न घेता निवृत्त व्हावे, असे ठरविलेले आहे. मात्र, राष्ट्राच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या व आपल्या जळगाव शहराच्या सर्वांगिण विकासासाठी ते मार्गदर्शक भूमिकेतच राहतील. याचबरोबर त्यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन समस्त शिवसैनिकांबद्दल प्रेम व आदर व्यक्त केलेला आहे.