Maratha community survey : जळगाव शहरातील मराठा समाजाचे सर्वेक्षण आता मनपा कर्मचारी करणार

Maratha community survey :  राज्यातील मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील सर्वेक्षणाच्या कामासाठी जळगाव महापालिकेच्या सहाशेहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना दोन दिवसात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, या कामाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्य मंत्रिमंडळाने 31 ऑक्टोबर 2023 ला घेतलेल्या निर्णयानुसार मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याबाबत कळविण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम काटेकोरपणे, युद्धपातळीवर व विहित कालावधीत अर्थात सात दिवसांत करण्याचे आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. जळगाव शहरातील सर्वेक्षण कामासाठी महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
आयुक्त नोडल अधिकारी
यासाठी जळगाव महापालिकेच्या आयुक्त, प्रशासक तथा नोडल अधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांना कामाच्या अनुषंगाने निर्देश दिले. यासाठी अधिकाऱ्यांना कामांच्या जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले आहे.

सहाशेवर अधिकारी-कर्मचारी

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्याच्या अनुषंगाने जळगाव शहरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी महापालिका स्तरावरून 6 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 586 कर्मचाऱ्यांची प्रगणक, 42 कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यात आयुक्त नोडल अधिकारी असून अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त व तीन सहाय्यक आयुक्तांची सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 4 मास्टर ट्रेनरची देखील नियुक्त करण्यात आली आहे. त्यांना आज शनिवारी प्रशिक्षण दिले जाणार असून हे मास्टर ट्रेनर दि.21 व 22 रोजी प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत.

समन्वय कक्षाची स्थापना

दि.23 ते 30 दरम्यान सर्वेक्षणाचे काम मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने सर्व नियुक्त प्रगणक, पर्यवेक्षकांना मास्टर ट्रेनर यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने विविध अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप केले आहे. तसेच कार्यालय अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.