जळगाव : वाळू ठेका चालवण्याच्या आरोपावरून तसेच शासकीय कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपानंतर जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एका पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे. विशेषतः त्यांना नियंत्रण कक्षात जमा केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार विश्वनाथ गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यातील दापोरा येथे एक पोलीस कर्मचारी वाळू ठेका चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी दापोरा येथे कारवाई करीत आठ ब्रास वाळू जप्त केली.
जप्त अवैध वाळूचा साठा तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्याचा असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाकडे केली होती.
संदर्भात परीविक्षाधीन अधिकारी पवार यांनी आपला अहवाल पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना सादर केला. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढल्यानंतर पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.