स्वच्छ जळगावचे स्वप्न अद्यापही कोसो दूर

तरुण भारत लाईव्ह  न्युज  जळगाव  : शहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेने वॉटर ग्रेस कंपनीस मक्ता दिला आहे. दिवसभरात २७० टन कचरा कंपनीचे कर्मचारी मनपा मालकीच्या गाड्यांद्वारे उचलतात. दररोज कचरा घेण्यासाठी घंटागाड्या आपापल्या विभागात जाणे आवश्यक आहे मात्र बर्‍याच भागात या गाड्या एकदिवसाआड जातात. परिणामी स्वच्छ जळगावचे स्वप्न अद्यापही कोसो दूर असल्याचे दिसून येते.

अनेक भागात कचरा संकलनास एक दिवसाआड फेरी, कचरा राहतोे पडून

कचरा संकलीत करून तो उचलण्याकरिता महानगरपालिकेने स्वतंत्र विभाग कार्यान्वित केला आहे. यासाठी वॉटरग्रेस कंपनीला हा कचरा उचलण्याचे काम देण्यात आले आहे. यात मनपा अधिकारी कर्मचार्‍यांसह त्या कंपनीनेही जवळपास १०० कर्मचारी यासाठी आहे. तरीदेखील शहरात अनेक कॉलन्यांमध्ये कचरा संकलन करणार्‍या गाड्या जात नसल्याची ओरड आहे.

यंत्रणा कमी

साडेपाच लाखांवर शहराची लोकसंख्या आहे. जळगाव शहरात तसेच महानगरपालिकेच्या वाढलेली हद्द बघता, शहरातील दैनंदिन कचरा संकलन करण्याकरिता केवळ १०० लहान घंटागाड्या आहे. त्यातही ८३ लहान गाड्याच सद्य:स्थितीत कचरा संकलन करताना दिसतात. १७ लहान गाड्या या बंद स्थितीत आहेत. यामुळे ८३ लहान गाड्या कुठे – कुठे जाणार आणि कोणकोणता भाग करणार? हा प्रश्न नव्हे तर महानगरपालिका आणि जळगावकरांसमोरील मोठे आव्हानच आहे. गाड्या कमी अन् लोकवस्ती जास्त अशामुळे अनेकदा काही भागात या कचरा संकलन करणार्‍या गाड्या जातच नसल्याची ओरड आहे. खर्‍या अर्थाने या लहान गाडयांना नियमानुसार दिलेल्या भागात जाणे बंधनकारक असताना या भागांमध्ये या गाड्या दांड्या मारताना दिसतात.

खासगी कंपनीचे १०० कर्मचारी

शहरात विविध भागांमध्ये विस्तारलेल्या जळगाव अंतर्गत अनेक लहान-मोठे भाग आहेत. यातच अनेक नगरे अशी आहेत की ज्या भागात अरुंद रस्ते आहे. या रस्त्यांमधून गाड्या ये-जा करू शकत नाही. शिवाय विस्तारलेल्या या शहराचा रोज कचरा संकलन करण्याचे काम करणार्‍या खासगी कंपनीकडे तोकडे मनुष्यबळ आहे. कंपनीकडे केवळ १०० कर्मचारीच असल्याचे सांगितले जाते. यंत्रणा वाढविल्यास शहरातून दैनंदिन २७० टन कचरा संकलित केला जातो. लहान घंटागाड्या व कंपनीने मनुष्यबळ वाढविल्यास शहरातील दैनंदिन जवळपास ३०० टन कचरा संकलित केला जाऊ शकतो. परिणामी ज्या कॉलन्यांमध्ये या गाड्या जात नाही तेथे कचरा गटारीत किंवा रस्त्याच्या कोपर्‍यात टाकला जात असतो.