पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये मंगळवारी एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पोलिस प्रशासन, मंत्री आणि राजकीय नेते अॅक्शन मोडमध्ये आले असले तरी अद्याप आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार आहे. पुणे पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी 13 पथकं तयार केली असून, त्याला पकडून देणाऱ्यासाठी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी थेट स्वारगेट बस डेपो गाठत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या ताफ्यासमोर आंदोलन केलं. त्यांनी कदम यांना थेट सवाल केला, “गृहराज्यमंत्री म्हणून तुम्ही 50 तासांनी का आलात? पोलिसांनी आरोपीला पकडायचं सोडून आम्हाला ताब्यात घेतलं!”
देसाईंनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही कठोर शब्दांत टीका केली. “एक लाखाचं बक्षीस जाहीर केलंय म्हणजे काय? पोलिसांना लाखो रुपये पगार फुकट मिळतो का? एक सराईत गुन्हेगार 50 तासांपासून फरार आहे, पोलिसांना त्याला पकडता येत नाही का?” असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा : अनैतिक संबंध : नवऱ्याचा काटा काढण्याचं ठरवलं अन् प्रियकरालाही गमावून बसली महिला, नेमकं काय घडलं?
तृप्ती देसाईंनी पुणे पोलिसांच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्लाबोल केला. “महिला सुरक्षिततेचं काय? बस स्थानकांमध्ये मटक्याचे आकडे, कंडोमच्या पाकिटांचा खच पडला आहे. हे प्रकार पुण्यासारख्या ठिकाणी चालणार नाहीत. आरोपी लवकर सापडला नाही तर आम्हालाच कायदा हातात घ्यावा लागेल!” असा इशारा त्यांनी दिला.
फरार आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी आणि अन्य 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं रवाना केली असून, त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
या घटनेनंतर पुण्यातील महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एसटीत मोफत प्रवास करणाऱ्या महिलांसाठीही बस स्थानकांमध्ये असुरक्षितता आहे, हे या घटनेतून स्पष्ट झालं. “बस स्थानकांत सुरक्षितता नाही, महिला घाबरून आहेत, प्रशासन झोपलंय,” अशी टीका होत आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. “आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. मात्र, तृप्ती देसाईंनी त्यावर प्रश्न उपस्थित केला, “बारामती बसस्थानक चकचकीत, पण स्वारगेट बसस्थानक अडगळीचं का? महिलांची सुरक्षितता सरकारसाठी एवढी कमी महत्त्वाची आहे का?”
पोलिसांना अल्टिमेटम!
पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करावी, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ, असा थेट इशारा तृप्ती देसाईंनी दिला आहे. पुणे पोलिसांवरील दबाव वाढत चालला असताना, आता प्रशासन आणि सरकार यावर काय पावलं उचलतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.