चाळीसगाव : तालुक्यातील तरवाडे पेठ येथे बंद घरातून चोरट्यांनी पावणेतीन लाखांचा ऐवज लांबवल्याने गावात खळबळ उडाली. बुधवार, 5 रोजी सकाळी 10 ते सायकांळी पाच दरम्यान ही घरफोडी झाली. तरवाडे पेठ येथील नामदेव शंकर तांबे (42) हे शेतीसह मोटारसायकल दुरुस्तीचे कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी सकाळी 10 वाजता नामदेव तांबे हे भाच्यासह चाळीसगाव येथील शास्त्रीनगरमधील आपल्या गॅरेजमध्ये कामाला गेल्यानंतर त्यांच्या पत्नी मुलांना शाळेत पाठवून शेतात गेल्याने घराला कुूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे आठ हजार रुपये किंमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे गहु मणी, 24 हजार रुपये किंमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन टोंगल, 20 हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन काप, एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे 30 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, 64 हजार रुपये किंमतीची 16 ग्रॅम वजनाची सोन्याची लहान पोत, 20 हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची एक अंगठी व 32 हजार रुपयांची रोकड असा सुमारे दोन लाख 88 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
सायंकाळी उघडकीस आला प्रकार
सायंकाळी तांबे घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. .तरवाडे येथे काही दिवसापूर्वी डॉक्टरच्या दवाखान्यातून किंमती ऐवज चोरीस गेल्यानंतर त्याचा तपास लागला नसतानाच भरदिवसा झालेल्या घरफोडीने गावात खळबळ उडाली. या प्रकरणी नामदेव शंकर तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहेत.