भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर तिसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडचा पराभव करत मालिकेत व्हाईट वॉश होण्याची नामुष्की टाळली. भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला 126 धावात रोखण्यात यश मिळवले होते. यानंतर हे आव्हान 19 षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.
भारताची उपकर्णधार आणि सलामीवीर स्मृती मानधनाने 48 चेंडूत 48 धावा करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्जने 29 धावा करत तिला चांगली साथ दिली. गोलंदाजीत आपला तिसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या श्रेयांका पाटीलने 4 षटकात 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तिच्याबरोबरच पदार्पण करणाऱ्या सैका इशाकने देखील 4 षटकात 22 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चांगलाच भोवला. रेणुका सिंह ठाकूर आणि सैका इशाकने पॉवर प्लेमध्येच इंग्लंडची अवस्था 3 बाद 26 धावा अशी केली होती. मात्र कर्णधार हेथर नाईटने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिला एमी जोन्सने 25 चांगली साथ दिली.
मात्र एमी बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव भारताच्या फिरकीपटू सैका इशाक आणि श्रेयांका पाटील समोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कर्णधार हेथरने एक बाजू लावून धरली होती. दहाव्या क्रमांकावर आलेल्या चार्ली डीनने 16 धावांचे योगदान दिले म्हणून इंग्लंड 126 धावांपर्यंत पोहचला.
127 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची देखील सुरूवात खराब झाली. सलामीवीर शफाली वर्मा 6 धावा करून बाद झाली. मात्र त्यानंतर स्मृती आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 57 धावांची भागीदारी रचत भारताला विजयीपथावर नेले. जेमिमाह 29 धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या दिप्ती शर्माने 12 धावांचे योगदान देत संघाला शतकाजवळ पोहचवले.
दुसरीकडे एक बाजू लावून धरलेली स्मृती मानधना आपल्या अर्धशतकाजवळ पोहचली होती. मात्र 5 चौकार आणि 2 षटकार मारणारी 48 चेंडूत 48 धावा करून बाद झाली. तिचे अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकले. मात्र तिच्या या खेळीमुळे भारत 112 धावांपर्यंत पोहचला होता. त्यानंतर कर्णधरा हरमनप्रीत (6) आणि अमनजोत कौरने (10) भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.