विराट कोहली सध्याच्या टी-२० विश्वचषकात आतापर्यंत तीन सामन्यांत केवळ पाच धावा करू शकला आहे. पण भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी ‘या स्टार फलंदाजाचा फॉर्म चिंतेचा विषय नाही’, असं म्हटल आहे.
काय म्हणाले विक्रम राठोड
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा कोहली विश्वचषकात आतापर्यंत अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. आयर्लंडविरुद्ध त्याने एक आणि पाकिस्तानविरुद्ध चार धावा केल्या, तर अमेरिकेविरुद्ध तो भोपळाही फोडू शकला नव्हता.कॅनडाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर राठोड म्हणाले की, विराट कोहली चांगली कामगिरी करो वा ना करो त्याच्याबद्दल मला प्रश्न विचारले जातात. हे चित्र समाधानकारक आहे. पण विराटच्या फॉर्मबाबत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. विराट ज्या स्पर्धेत खेळून येथे आला आहे त्या स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली आहे. काही सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यामुळे गोष्टी बदलत नाही. खरोखरच तो चांगली कामगिरी करत आहे.
प्रशिक्षकांचा विराटवर पूर्ण विश्वास
विराट कोहली संघाला गरज असल्यावर नक्कीच शानदार कामगिरी करेल, असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, धावा करण्यासाठी तो अधिक उत्सुक दिसत आहे.प्रत्यक्षात तो चांगली कामगिरी करण्यास उतावीळ आहे. त्यामुळे पुढील काही सामन्यांत तो शानदार कामगिरी करेल, शिवम दुबे, अक्षर पटेल यांच्यासह चार अष्टपैलू खेळाडूंना संघात ठेवण्याबाबतच्या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले नाही.
ते म्हणाले की, आम्हाला संघात लवचिकता हवी आहे. आम्हाला परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याची गरज आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेसे पर्याय आहेत.