T20 World Cup 2024 : टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळणार ‘हा’ नवा नियम; याचे उल्लंघन केल्यास…

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून T20 विश्वचषक २०२४ स्पर्धा सुरू होणार आहे. आयसीसीची मोठी स्पर्धा अमेरिकेत पहिल्यांदाच होत आहे, त्यामुळे त्याबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे. तसेच, 14 वर्षांनंतर वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी स्पर्धा परतली आहे. याआधी 2010 मध्येही तिथे टी-20 वर्ल्डकप झाला होता. नियम आणि संघांसह काही गोष्टी या विश्वचषकात प्रथमच घडत आहेत. अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे आणि अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळतील.

विश्वचषक कधी सुरू होईल आणि किती काळ चालेल?
T20 विश्वचषक 2 जून (भारतीय वेळेनुसार) सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होईल, जेव्हा यजमान अमेरिका आणि कॅनडा स्पर्धा करतील. 29 जून रोजी अंतिम फेरीसह स्पर्धेचा समारोप होईल.

यावेळी किती संघ सहभागी होत आहेत?
T20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच 20 संघ एकाच वेळी सहभागी होत आहेत. यजमान म्हणून अमेरिकेला यात स्थान मिळाले असून ही संघाची पहिलीच स्पर्धा आहे. कॅनडा आणि युगांडा हे संघही पहिल्यांदाच विश्वचषकात खेळणार आहेत. याशिवाय भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, नेदरलँड, स्कॉटलंड, आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, वेस्ट इंडीज, नामिबिया, अफगाणिस्तान आणि ओमान हे या विश्वचषकाचा भाग आहेत.

विश्वचषकाची ठिकाणे कोठे आहेत?
ग्रुप स्टेजचे सामने अमेरिकेत न्यूयॉर्क, डॅलस आणि लॉडरहिल (फ्लोरिडा) येथे खेळवले जातील. ग्रुप स्टेज, सुपर-8, सेमीफायनल आणि फायनल वेस्ट इंडिजमधील ब्रिजटाऊन, प्रोव्हिडन्स, नॉर्थ साउंड, ग्रोस आयलेट, किंग्स्टन आणि तारोबा येथे खेळल्या जातील. अंतिम सामना ब्रिजटाऊन (बार्बाडोस) येथे होणार आहे.

यावेळच्या विश्वचषकाचे स्वरूप काय आहे?
यावेळचा विश्वचषक ग्रुप स्टेज आणि सुपर-8 अशा फॉरमॅटमध्ये आहे. सर्व 20 संघांची प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील 2-2 संघ सुपर-8 फेरीत पोहोचतील, जिथे ते 4-4 च्या दोन गटात असतील. सुपर-8 मधील 2-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि त्यानंतर अंतिम फेरी होईल.

सामने टाय झाले तर निर्णय कसा घेणार?
कोणताही सामना टाय झाला तर त्याचा निर्णय सुपर ओव्हरने होईल. जर सुपर ओव्हर देखील टाय झाली, तर पुढील सुपर ओव्हर होईल आणि सामन्यासाठी दिलेला अतिरिक्त एक तासाचा वेळ पूर्ण होईपर्यंत हे चालू राहील. त्यानंतरही निर्णय झाला नाही, तर दोन्ही संघांना ग्रुप स्टेज आणि सुपर-8 मध्ये समान गुण मिळतील. उपांत्य फेरीत असे घडल्यास, सुपर-8 फेरीतील उच्च क्रमांकाचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

पाऊस किंवा खराब हवामान व्यत्यय आणल्यास सामने कसे होणार?
T20 च्या नियमांनुसार, कोणत्याही सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी, किमान 5-5 षटकांचा सामना असणे आवश्यक आहे. ग्रुप स्टेज आणि सुपर-8 मध्येही हेच लागू होईल. जर सामना शक्य नसेल तर गुणांची वाटणी केली जाईल. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी नियम थोडे वेगळे आहेत.

सेमीफायनल आणि फायनलचा निर्णय कसा होणार?
उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत निकाल मिळविण्यासाठी 10-10 षटकांचा सामना होणे आवश्यक आहे. जर हे शक्य नसेल तर पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवसाची तरतूद आहे, ती दुसऱ्या दिवशीच आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी असे नाही कारण अंतिम सामना एका दिवसाच्या अंतरानंतरच खेळला जाणार आहे. त्यामुळे, कोणताही राखीव दिवस नाही परंतु त्याच दिवशी सामना संपण्यासाठी 250 मिनिटे म्हणजेच 4 तास 10 मिनिटे असतील.

जर निकाल लागला नाही तर सुपर-8 मधील आपापल्या गटातील अव्वल संघच अंतिम फेरीत पोहोचतील. अंतिम सामन्यासाठी ३० जून हा दिवस राखीव ठेवण्याची तरतूद आहे. तरीही सामना झाला नाही तर दोन्ही संघ संयुक्त विजेते असतील.

टीम इंडियाच्या गटात कोणते संघ आहेत?
भारतीय संघ ‘अ’ गटात असून, त्यात अमेरिका, पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा हे संघ आहेत. टीम इंडियाचे ग्रुप स्टेजचे सामने भारत विरुद्ध रात्री ८ वाजता (स्थानिक वेळेनुसार) होतील.

हा नवा नियम टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळणार
यावेळी तो नियम विश्वचषकात पाहायला मिळणार असून त्यामुळे अनेक संघांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. आयसीसीने सामन्यांचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत सामने पूर्ण करण्यासाठी ‘स्टॉप क्लॉक’ सुरू केले आहे. या अंतर्गत, एक षटक संपल्यानंतर पुढील षटक सुरू करण्यासाठी फक्त 60 सेकंदांचा अवधी दिला जाईल. कोणत्याही संघाने याचे उल्लंघन केल्यास त्याला दोनदा ताकीद दिली जाईल. तरीही चूक झाल्यास 5 धावांचा दंड आकारला जाईल.

तुम्ही T20 वर्ल्ड कप 2024 कुठे पाहू शकता?
भारतातील T20 विश्वचषकाचे सामने अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. स्पर्धेचे ऑनलाइन स्ट्रीमिंग डिस्ने-हॉटस्टार प्लॅटफॉर्मवर होईल.