नवी दिल्ली : मुंबईवर झालेल्या भीषण २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा अखेर भारताच्या ताब्यात आला आहे. भारताने तब्बल १७ वर्षांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. प्रत्यार्पण कराराच्या अंतर्गत अमेरिकेने त्याला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएच्या हवाली केले. अमेरिकेत पाठवण्यात आलेले विशेष विमान त्याला घेऊन आज दिल्ली विमानतळावर उतरले आहे.
तहव्वूर राणाला घेऊन निघालेले विमान आज गुरुवारी दिल्ली विमानतळावर उतरले आहे. आता तहव्वूर राणाला सर्वप्रथम राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएच्या न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर त्याची कोठडी घेतल्यावर अधिकारी कसून चौकशी करतील. दरम्यान, दिल्ली आणि मुंबईत तहव्वूर राणासाठी तुरुंगाची कोठडीही सज्ज ठेवण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सर्वांत पहिले एनआयए तहव्वूर राणाची चौकशी करणार असून, त्यानंतर मुंबई पोलिसांना ही संधी दिली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानातील १० अतिरेक्यांनी मुंबईवरील केलेल्या हल्ल्याशी संबंधित अनेक रहस्य त्याच्या चौकशीतून समोर येणार आहेत. जगासमोर पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासही यामुळे मदत मिळेल. तहब्बूर राणा मूळ पाकिस्तानी आणि कॅनडाचा नागरिक असून, तो लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय सदस्यही आहे.
हल्ल्याच्या पाच दिवस आधी काढला पळ
हल्ल्यापूर्वी तहब्बूर राणा दुबईमार्गे भारतात आला होता. ११ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २००८ या कालावधीत तो पवईतील हॉटेल रिनैसा येथे थांबला होता. या कालावधीत त्याने हल्ल्याशी संबंधित ठिकाणे आणि व्यवस्थेचा आढावा घेतला. त्याने हल्ल्याच्या पाच दिवसांपूर्वी मुंबईतून पळ काढला होता.