ताईंचा पक्षपात!

मुंबई वार्तापत्र

– नागेश दाचेवार

कसं असतं ना, ‘आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कारटं.’ असाच काहीसा प्रकार सुप्रियाताई करताना दिसत आहेत. ताईंना स्त्री स्वाभिमान खूप आहे; मात्र तो ‘सिलेक्टिव्ह’ आहे. ताई स्त्रियांविरोधातील अत्याचाराविरोधात नेहमी आवाज उठवताना आणि विरोध करताना दिसतात. मात्र, तो सिलेक्टिव्ह विरोध दिसतो. याचा अर्थ काय घ्यायचा? ताईंच्या द़ृष्टीने निवडक महिलांनाच सन्मान, अब्रू वगैरे आहे आणि काहींना नाही, असा घ्यायचा? की, ताईंना वाटेल किंवा ताई म्हणेल तीच महिला, असे ग्राह्य धरून सरकारने आणि अन्य यंत्रणांनी तशी वागणूक त्यांना द्यायची; आणि अन्य महिला ज्यांना ताईंनी महिला असल्याचे प्रमाणपत्र दिलेलं नाही, त्यांच्या बाबतीत काहीही केलेलं, बोललेलं चालेल, असा घ्यायचा? बरं; महिला म्हणून अवमान झालाय्, हे ताईच कसं ठरवू शकतात? हा पण प्रश्नच आहे. दुसरं म्हणजे या छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिलांच्या अवमानाचे वर्गीकरण ताई कशा करतात? हा देखील गहन अभ्यासाचाच विषय आहे. कारण एखादी व्यक्ती एखाद्या महिलेला ‘हरामखोर’ म्हणते तेव्हा त्या महिलेचा अवमान होत नाही. मात्र, त्याचवेळी एखादी व्यक्ती एखाद्या महिलेला ‘भिकारचोट’ म्हणाली तर तो अवमान ठरतो! आता या दोन्ही प्रकारात नेमकं ताई कसं ठरवतात, हा अवमान आहे आणि हा नाही… ही ताईंची कला, हातोटी खरोखर वाखाणण्याजोगीच म्हणावी लागेल. कारण हा असं पारखण्याचा आणि इतका क्लिष्ट विषय इतक्या सहजतेने ओळखण्याची क्षमता म्हणा किंवा कल्पकता म्हणा, सहजासहजी सर्वसामान्य महिला आणि पुरुषांमध्ये आढळून येत नाही. तसं तर काही गोष्टी या आनुवंशिकतेतूनदेखील येतात. ताईंच्या वडिलांकडेही अनेक सुप्त गुण आहेत. त्यातून ताईंकडेदेखील आनुवंशिकतेतून हा अनन्यसाधारण असा गुण आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, बरं का…!

कंगना राणावतसाठी संबोधलेला शब्द असो, स्वप्ना पाटकरांसाठी वाहिलेली शिव्यांची लाखोळी असो किंवा मग केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि खासदार नवनीत राणांसाठीचे त्याच व्यक्तीची शब्दसुमने असोत… मग अभिनेत्री केतकी चितळे आणि अमृता फडणवीस यांच्याविषयी वापरलेली भाषा असो… नाहीतर नुकतेच युवा काँग्रेस अध्यक्षाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविषयीचे केलेले वक्तव्य असो, अलिकडेच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्याविषयी समाजमाध्यमांवर केलेले विकृत दर्शन असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत असलेल्या महिला आमदारांविषयी काढलेले अपशब्द, जितेंद्र आव्हाडांनी सार्वजनिक कार्यक्रमात केलेला महिलेचा विनयभंग, खासदार नवनीत राणा, रेणू शर्मा, करुणा शर्मा यांच्याबाबतीत घडलेल्या, नव्हे घडवलेल्या घटना असो, तसे तर असे शब्द आणि कृती सुसंस्कृत महाराष्ट्रात सुसंस्कृत माणसाने बोलण्याची आणि करण्याची नाही. पण या महिलांसाठी वापरण्यात आलेल्या भाषेचा, वक्तव्याचा, शिव्यांचा किंवा व्हायरल केलेल्या बनावट व्हिडीओंचा Supriyatai सुप्रियाताईंनी कुठेही विरोध केलेला किंवा किमान निषेध केलेलादेखील ऐकिवात नाही. किंबहुना यासंदर्भात वाच्यतादेखील केली नाही. सुषमा अंधारेंबाबत आवाज उठवणार्‍या सुप्रियाताईंनी जर स्मृती इराणींबाबतच्या वक्तव्यावरही आवाज उठवला असता, महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या विरोधात पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवला असता, तर खर्‍या अर्थाने ताई महिलांच्या आत्मसन्मानासाठी, न्याय्य हक्कांसाठी लढतात, असे म्हणता आले असते. पण ताईंना महिलांचं काही एक देणंघेणं वगैरे नाही. राजकीय स्वार्थासाठी विरोधकांवर आरोप करण्यासाठी महिलांचा खांदा तेवढा त्या वापरतात आणि त्यामुळेच महिलांचा अवमान हा ताईंच्या दृष्टीने ‘सिलेक्टिव्ह’ असा झालेला आहे.

म्हणजे महिला आपल्या किंवा आपल्या सहकारी पक्षाची असेल तर तिचा अवमान होत नसला, तरी तो होतो आणि आपल्या विरोधी पक्षाची किंवा विचारांची असेल, तर तिचा खर्‍या अर्थाने अवमान होत असेल, तरी ताईंच्या दृष्टीने तो होत नसतो. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केलेल्या आपल्या सुनेवरील घरगुती हिंसाचारानंतर लोकांनी अश्लील नव्हे, पण टीका केली; सुषमा अंधारेंना गुलाबराव पाटलाने नटी म्हटले तर संजय शिरसाटांनी ‘काय लफडी करून ठेवलीत या लोकांनी’ असे आपल्याच आमदारांना म्हटलं, ते ओढूनताणून अंधारेंबाईंनाच म्हटल्याचे सांगितले जात आहे. अब्दुल सत्तारांनी सुप्रियाताईंसाठी वापरलेला शब्द हा महिलेचा अवमान होईल अशातला नव्हता. किशोरी पेडणेकरांनी अ‍ॅड. आशिष शेलारांवर दाखल केलेली पोलिस तक्रारसुद्धा सत्ता असल्याचा गैरफायदाच म्हणावी लागेल. अशा तकलादू गोष्टींच्या वेळी सुप्रियाताईंनी तीव्र विरोध, संताप व्यक्त केला. यावेळी ताईंना छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान वगैरे कसा केला जावा, याची उपरती आली. पण हीच उपरती संजय राऊत नामक वाचाळ माणसाने दोन महिलांना जेव्हा अत्यंत अपमानजनक, खालच्या पातळीवरील शिवीगाळ केली, तेव्हा मात्र Supriyatai सुप्रियाताईंना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती नाही आठवली. मग सुप्रियाताई कोणत्या संस्कृतीची जपणूक करू इच्छित आहेत?

– 9270333886