जळगाव : महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क अभय योजना – २०२३ दोन टप्प्यांमध्ये जाहीर केलेली असून पहिल्या टप्प्यात ही योजना १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील नोंदणीकृत /अनोंदणीकृत निष्पादीत दस्तऐवजांसाठी देय असणा-या मुदांक शुल्कापेक्षा कमी शुल्क भरुन झालेले दस्तऐवजांना होणा-या वसुलीस पात्र मुद्रांक शुल्क व त्यावरील दंडाला लागु केलेली आहे.
पहिल्या टप्प्यांमध्ये सदर योजना १ डिसेबर २०२३ ते ३१ जानेवारी-२०२४ पर्यत असून त्यात मुद्रांक शुल्क व त्यावरील दंड मध्ये भरगोस सूट/ माफी देण्यात आलेली आहे तरी मुद्रांक शुल्क व दंड सूट/माफी योजनेचा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये घ्यावा असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी सुनिल पाटील यांनी केले आहे.
ज्यांच्या 7/12 उता-यावर इतर अधिकारामध्ये मुद्रांक शुल्काचे बोजे बसविण्यात आलेले आहेत त्यांनी तालुक्याच्या दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा. या योजनेचा लाभ पहिल्या टप्पयात ३१ जानेवारी २०२४ पर्यत घेऊन भविष्यात होणा-या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ४६ (महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ च्या कलम १७६ नुसार) वसुली कायद्यानुसार नागरिकांना सक्तीची कारवाई टाळण्याची ही संधी नागरिकांना उपलब्ध झालेली आहे.
मुद्रांक शुल्क व दंड देय असणा-या नागरिकांनी त्वरीत सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जळगांव, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पहिला मजला किंवा नजिकच्या दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा.