नवी दिल्ली : आधीच चहूबाजूंनी अडचणींमध्ये अडकलेल्या पाकिस्तानच्या संकटात अजून एक भर पडली आहे. ज्या तालिबानला पाकिस्ताननं मोठं केले, त्याच तहरीक ए तालिबान पाकिस्तान म्हणजे टीटीपी ने पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारले आहे. अफगाणिस्तानच्या सीमेलगत पाकिस्तानी सैन्य आणि टीटीपी यांच्यात भीषण गोळीबारी सुरू आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या ४ सैन्याचा मृत्यू झाला आहे. तर अनेक पाक सैनिकांना बंदीस्त केल्याचे समोर आले आहे. यासह तालिबानने पाकिस्तानच्या अनेक गावांवर कब्जा केला असल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात चित्राल जिल्हाय टीटीपी ने पाकिस्तानी सैन्याविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. पाकिस्तान आणि टीटीपी यांच्या संघर्षामुळे तोरखम बॉर्डर सील करण्यात आली आहे. तहरीक-ए-तालिबान म्हणजे टीटीपी चे कमांडरने अफगाणिस्तान मीडियाला सांगितले की, आम्ही पाकिस्तानच्या अनेक गावांवर कब्जा केला आहे. सध्या त्याठिकाणी इंटरनेट नेटवर्क खराब आहे. इंटरनेट आल्यानंतर कब्जा केलेल्या गावांचे फोटो, व्हिडिओ समोर आणले जातील.
नोव्हेंबर २०२२ मध्ये टीटीपी ने पाकिस्तानी सैन्याविरोधात युद्ध पुकारले. टीटीपी चं म्हणणं आहे की, आम्ही पाकिस्तानी सैन्याला हरवून तिथल्या सरकारची सत्ता उखडून टाकू. मग त्याठिकाणी तहरीक ए तालिबान शरिया कायद्याचं पालन करणारे सरकार बनवेल. या मिशनला पूर्ण करण्यासाठी टीटीपी ने मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानात मोठमोठे हल्ले केले आहेत. टीटीपी ला अलकायदाचे निकटवर्तीय मानले जाते. २ सप्टेंबरला अफगाणिस्तान सीमेनजीक कबायली परिसरात पाक सैन्याने गुप्तचर ऑपरेशन केले. या ऑपरेशनचा हेतून तिथे लपलेले टीटीपी सैनिकांना संपवणे होते. परंतु या चकमकीत पाकिस्तानी सैन्याचे १ मेजर आणि १ सैनिक यांचा मृत्यू झाला. याआधी २ दिवसांपूर्वी पख्तूनख्वामध्ये टीटीपीच्या आत्मघाती हल्ल्यात ९ पाकिस्तानी सैन्याचा मृत्यू झाला आहे.