Taloda : नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

Taloda : धडगाव तालुक्यातील रोषमाळ येथील आदित्य विजय ब्राह्मणे या बालकाने नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या दोन चुलत मामे भावांना वाचवितांना स्वत:चा प्राण गमावल्याने त्याला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला . २२ जानेवारी रोजी त्याच्या पालकांना नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास केंद्रिय मंत्री स्मृती इराणी व मान्यवर उपस्थित होते.

आदित्य आणि त्याचे मामे भाऊ शहादा येथील दरा या गावी वाकी नदी किनाऱ्याजवळ खेळत होते. खेळताना त्यांचे मामे भावंडे बुडू लागले. हे पाहून आदित्यने धोका असलेला उतार लक्षात न घेता खोल पाण्यात उतरून आपल्या मामे भावांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मामे भाऊ वाचले परंतु दुर्दैवाने, आदित्य खूप खोल गेला, त्यामुळे त्याला लगेच शोधणे कठीण झाले. आदित्यचा प्रयत्न व्यर्थ गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.

मात्र, कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखविले. त्याच्या या शौर्यपूर्ण प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार आदित्यचा लहान भाऊ आरुश ब्राह्मणे याने स्वीकारला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी, 2024 रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील. वडील विजय ब्राह्मणे हे धडगाव येथे माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांना दोन मुलं असून, आदित्य हा मोठा होता.

 

आदित्यला लहान पणापासून देशसेवेसाठी सैनिक व्हायची इच्छा होती. ती त्याची पूर्ण होऊ शकली नाही. परंतु त्याच्या कर्तृत्वामुळे शहीद झालेल्या जवानांप्रमाणेच त्याला शौर्य पुरस्कार मिळत असल्याने आम्हाला अभिमान वाटतो आहे. आपल्या जिल्ह्याला शिरीष कुमार यांच्या शौर्याचा वारसा लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी व नंदुरबार वासियांसाठी गर्वाचा व अभिमानाचा क्षण आहे.

विजय ब्राह्मणे, वडील.