पुणे : माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा सोमवारी अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी त्याच्या अपहरणाच्या शक्यतेचा अंदाज वर्तवला. मात्र, तपासानंतर तो बेपत्ता नसून खासगी चार्टर विमानाने बँकॉकला गेल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाल करत विमानाला भारतात परत आणले. या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी सत्ता आणि पोलिस दलाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
गोंधळ उडाल्यानंतर पुणे पोलिसांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्क साधला. तसेच, चार्टर विमानाच्या कॅप्टनशी चर्चा करत विमान बँकॉकला जाण्याऐवजी भारतात परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, हे विमान प्रथम विशाखापट्टणम येथे उतरवले गेले आणि नंतर रात्री उशिरा पुण्यातील लोहगाव विमानतळावर परत आले.
काय म्हणाले तानाजी सावंत?
तानाजी सावंत यांनी हा संपूर्ण प्रकार गोंधळातून घडल्याचे स्पष्ट केले. “माझ्या मुलाचा आणि माझा कोणताही वाद नव्हता. तो काही दिवसांपूर्वी दुबईला गेला होता. त्यानंतर त्याला बँकॉकला एका बिझनेस डीलसाठी जावे लागले. मात्र, त्याने कुणालाही काहीही सांगितले नव्हते, त्यामुळे काळजी वाटली,” असे त्यांनी सांगितले.
मुलाने दिले स्पष्टीकरण
तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत याने यावर स्पष्टीकरण दिले आहे. “माझा छोटा भाऊ दुबईहून परतल्यानंतर काही बिझनेस कारणांसाठी बँकॉकला निघाला होता. त्यासाठी त्याने खासगी चार्टर विमानाचा वापर केला. मात्र, घरच्यांना याबद्दल कल्पना नसल्याने हा गैरसमज झाला,” असे गिरीराज सावंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान , या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी सत्ता आणि पोलिस दलाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.