नाशिक : गोविंदनगर येथील सदाशिवनगर जॉगिंग ट्रॅकसमोर झालेल्या भीषण अपघातात गायत्री संदीप ठाकूर (वय ३८, रा. अनुश्री अपार्टमेंट, पांडवनगरी वडाळा पाथर्डी रोड) या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची समोर येत आहे.
इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जात असलेल्या (एमएच १४ जेई ०९००) या चारचाकी कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार रस्त्यावर उभ्या असलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांना धडकली. या धडकेत गायत्री ठाकूर यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात नीलम जाचक (वय ३५) आणि संतोष अंबादास चोरमले (वय ३५, रा. सातपूर) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारसह चालकाला ताब्यात घेतले आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गायत्री संदीप ठाकूर यांचे पती एलआयसी मध्ये नोकरीला असून, त्यांना दोन मुली आहेत. एक मुलगी इयत्ता दुसरीत तर दुसरी मुलगी इयत्ता सातवीत शिकते. गायत्री ठाकूर या उंटवाडी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या. रविवारी शाळेतील एका शिक्षकाच्या मुलाचे लग्न असल्याने त्या सहकारी शिक्षिकेसोबत दुचाकीने सोमेश्वर लॉन्स येथे गेल्या होत्या. तेथून परतताना हा दुर्दैवी अपघात घडला.
कारची धडक आणि नुकसान
या अपघातामुळे उभ्या असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांनादेखील कारने जोरदार धडक दिली, ज्यामुळे दोन ते तीन वाहने नुकसान झाल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.