Team India Head Coach : टी-२० विश्वचषकाला २ जूनपासून सुरुवात होणार आहे. पण, त्यासोबतच टीम इंडियातील प्रशिक्षकाचा शोधही चर्चेचा विषय राहिला आहे. BCCI ने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज मागवले होते, ज्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे होती. बीसीसीआयला 3000 हजारहून अधिक बनावट अर्ज प्राप्त झाले. एवढेच नाही तर त्या बनावट अर्जांमध्ये नरेंद्र मोदी, शाहरुख खान, अमित शाह, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर अशा देशातील काही प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचे अर्ज होते. हे अर्ज पाहून बीसीसीआय अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना अर्ज छाननी करताना त्रासाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, हे सर्व अर्ज बनावट असल्याचं निश्चित झालं आहे.
बीसीसीआयला बनावट अर्ज कसा आला ?
बीसीसीआय हे क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. अशा स्थितीत त्याच्याकडे इतके बनावट अर्ज कसे आले, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यासाठी गुगल डॉक्युमेंट फॉर्म ऑनलाइन जारी केल्याची बातमी आहे. हा प्रकार प्रत्येकाच्या आवाक्यातला होता. यामुळेच अनेकांनी अर्ज केले. काहींनी स्वतःच्या नावाने हे केले तर अनेकांनी देशातील निवडक सेलिब्रिटींची नावे वापरून बनावट अर्ज सादर केले.
बीसीसीआयकडून काय विधान आलं ?
याबाबत आता बीसीसीआयच्या सूत्रांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अर्ज भरण्याची प्रक्रिया पब्लिक डोमेनमध्ये असल्याने अनेकांनी बीसीसीआयच्या वेबसाइटवर जाऊन प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरले. याबाबत बीसीसीआयने विचार करण्याची गरज असल्याचे सूत्रांनी मान्य केले. ते अर्ज मागवण्याची काही नवीन पद्धत आणू शकतील की नाही याचा विचार करावा लागेल, जेणेकरून बनावट अर्जांना आळा बसेल.