टीम इंडिया मुंबईत पोहोचण्यापूर्वी पावसाचा इशारा, कसा होणार रोड-शो ?

हवामान खात्याने २४ तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच अनेक भागात आकाश ढगाळ होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईच्या मरिन ड्राइव्हवरही भरतीचा धोका निर्माण झाला आहे. T-20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया आज भारतात परतली आहे. टीम इंडियाचा मुंबईत संध्याकाळी 5 वाजता रोड शो आहे.

जुलै महिना सुरू होताच मान्सूनने देशभर हजेरी लावली आहे. यापूर्वी जूनमध्येच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यानंतर मुंबई उपनगरासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई-ठाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात आपत्ती ठरत आहे. पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले तरी अनेक भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. IMD नुसार, राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो.

नरिमन पॉइंटवरून खुल्या बसमध्ये टीम इंडियाचा रोड शो
T-20 वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया बार्बाडोसहून विमानाने दिल्लीला परतली आहे. विजयाच्या सन्मानार्थ टीम इंडियाचा मुंबईत रोड शो आहे. टीम इंडियाचा रोड शो नरिमन पॉईंट येथून खुल्या बसमध्ये आयोजित केला जाईल. दरम्यान, पावसाचा इशारा पाहता टीम इंडियाच्या रोड शोबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, मुंबईत अंशत: ढगाळ आकाश आणि एक-दोन वेळा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रोड शो दरम्यान हवामान आल्हाददायक असण्याची शक्यता आहे.

वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रम
टीम इंडिया दिल्लीहून विमानाने दुपारी ४ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचेल. येथे वानखडे स्टेडियमवर त्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, परंतु त्याआधी खुल्या बसमधून टीम इंडियाचा रोड शो (विजय परेड) आयोजित केला जाईल. नरिमन पॉइंट येथून सायंकाळी ५ वाजता या रोड शोचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंना 125 कोटी रुपयांच्या जाहीर बक्षीस रकमेने गौरविण्यात येणार आहे.