टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये आपली रणनीती तपासणार आहे. या सीरीजमधून भारतीय संघ व्यवस्थापनाला योग्य कॉम्बिनेशन निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. दुबईतील कंडिशन्स लक्षात घेऊन हेड कोच गौतम गंभीर यांना अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे विकेटकीपर फलंदाज कोण असणार?
विकेटकीपर फलंदाजाच्या निवडीसाठी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यात चुरस आहे. हे दोघेही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत असतात. दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील त्यांच्या प्रदर्शनाबाबत बोलायचं झाल्यास, ऋषभ पंतला अद्याप या मैदानावर खेळण्याचा अनुभव नाही. तर केएल राहुलने दुबईत फक्त एक सामना खेळला असून त्यात 60 धावा केल्या होत्या. मात्र, त्याला 6 वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. अशा परिस्थितीत या सीरीजमधील त्यांची सध्याची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.
मॅच विनर कोण ?
गौतम गंभीरसाठी पंत आणि राहुल यांच्यातील निवड अत्यंत कठीण आहे. फॉर्ममध्ये असल्यास राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, पंतकडे डावखुरा फलंदाज म्हणून संघाला विविधता देण्याची क्षमता आहे. शिवाय त्याची मॅच विनर म्हणून ओळख आहे.
खेळाडूंच्या फॉर्मवर अंतिम निर्णय
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा अंतिम संघ ठरवण्यासाठी इंग्लंडविरुद्धची वनडे सीरीज ही कसोटी असेल. यात केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यासह इतर खेळाडूंच्या फॉर्मची कसोटी लागेल. या सीरीजमधून मिळालेल्या फॉर्मचा आधार घेत गंभीर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम विकेटकीपर फलंदाज निवडतील.
टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी इंग्लंड विरुद्धची सीरीज ही मोठी उत्सुकतेची असणार आहे. आता बघावं लागेल की, राहुल आणि पंत यांच्यापैकी कोण अंतिम 11 मध्ये स्थान मिळवतो आणि दुबईतील स्पर्धेसाठी स्वतःला सिद्ध करतो.