रोहित-यशस्वीची निराशाजनक सलामी
मुंबईकडून खेळताना, कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही सलामीची जोडी मैदानात आली. मात्र, दोघेही झटपट बाद झाले. रोहितने 3 धावा केल्या तर यशस्वीने केवळ 4 धावांची भर घातली. रणजी ट्रॉफीतही रोहितचा फ्लॉप शो कायम राहिल्याने चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.
पंजाबच्या कर्णधार शुबमन गिलकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, कर्नाटकविरुद्ध खेळताना शुबमन केवळ 4 धावा करून बाद झाला. त्याने 8 चेंडूंचा सामना केला, पण त्याच्या कामगिरीत आत्मविश्वासाचा अभाव दिसला.
श्रेयस अय्यरचा प्रयत्न निष्फळ
मुंबईकडून खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने दुहेरी आकडा गाठला, मात्र तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. जम्मू-काश्मिरविरुद्ध खेळताना श्रेयसने केवळ 11 धावांची खेळी केली आणि तोही झटपट तंबूत परतला.
दिल्लीकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतच्या कामगिरीने चाहत्यांचा भ्रमनिरास केला. विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतला 10 चेंडूंत केवळ 1 धाव करता आली. त्याची बॅट अजिबात तळपली नाही, ज्यामुळे दिल्ली संघालाही धक्का बसला आहे.
भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल चिंता
टीम इंडियाच्या पाच प्रमुख खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये घोर निराशा केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाच्या तयारीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फलंदाजांच्या या खराब कामगिरीमुळे आगामी स्पर्धेत त्यांची भूमिका काय असेल, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. चाहत्यांची ही चिंता आगामी सामन्यांत खेळाडूंची कामगिरीच दूर करू शकेल.