तेलंगणा निवडणूक! अभाविपचा कार्यकर्ता कॉग्रेसचा हात धरुन होणार मुख्यमंत्री? कोण आहेत रेवंत रेड्डी, कसे ठरले गेमचेंजर

तेलंगणात २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत ११९ पैकी २२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने २०२३ मधील निवडणुकीत इतिहास घडवला. बीआरएसचे सर्वेसर्वा केसीआर यांच्या साम्राज्याला काँग्रेसने सुरुंग लावले. रविवारी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने तेलंगणात ११९ पैकी ६९ जागांवर आघाडीवर आहे.

काँग्रेसचा विजय निश्चित आहे, या विजयाचे श्रेय दिलं जातंय ते रेवंत रेड्डी यांना. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात प्रवेश करणारे रेवंत रेड्डी यांनीच बीआरएस आणि भाजपा यांचं विमान जमिनीवर आणलं आहे.

तेलंगाणामध्ये तर रेवंत रेड्डी यांचा चेहरा वेगळ्या प्रकारे समोर येताना दिसतो आहे. ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार की काय अशाही चर्चांना उधाण आले आहे. तेलंगाणाच्या राजकीय पटलावर नवा बदल दिसणार की आणखी कुणाला संधी मिळणार असे प्रश्नही समोर येताना दिसत आहेत. मध्य प्रदेश, तेलंगाणा, राजस्थान आणि छत्तीसगढ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकांच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

जन्म आणि कौटूंबिक पार्श्वभूमी –

चार राज्यांच्या निकालावर आगामी काळातील निवडणूकांकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जाणार आहे. अशावेळी एक्झिट पोलमधून यंदाच्या विधानसभा निवडणूकांमध्ये कॉग्रेसला थोडं झुकतं माप देण्यात आले होते. प्रत्यक्षात चित्र वेगळ्या प्रकारे समोर येताना दिसत आहे. या सगळ्यात तेलंगाणामधील कॉग्रेसचे उमेदवार रेवंत रेड्डी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

तेलंगाणा मध्ये मुख्यमंत्री पदासाठी कॉग्रेसकडून प्रदेश अध्यक्ष ए रेवंत रेड्डी यांचे नाव घेतले जात आहे. सोशल मीडियावर देखील त्याविषयी वेगवेगळ्या पोस्ट चर्चेत आहेत. ८ नोव्हेंबर १९६७ मध्ये आंध्र प्रदेशातील नगरकुर्नूलमधील कोंडारेड्डी नावाच्या ठिकाणी रेड्डी यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनुमुला नरसिम्हा रेड्डी तर आईचे नाव अनुमुला रामचंद्रम्मा असे आहे.

रेड्डी यांचे शिक्षण किती?

हैद्राबाद येथील ए वी कॉलेजमधून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी एक प्रिटींग प्रेसही सुरु केली. ७ मे १९९२ रोजी रेवंत यांनी कॉग्रेसचे वरिष्ठ नेता आणि माजी केंद्रीय सुचना, प्रसारण मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची अनुमुला गीता यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. सुरुवातीच्या काळात रेवंत रेड्डी यांना राजकीय प्रवेशावरून घरातूनच मोठ्या वादाला सामोरं जावं लागलं होतं.

राजकीय प्रवासाला सुरुवात कशी झाली?

लग्नानंतर रेवंत यांचा राजकीय प्रवास वेगानं सुरु झाला असे म्हटले जाते. त्यानंतरची त्यांची राजकीय वळणं ही खूप काही सांगून जाणारी आहेत. रेड्डी हे विद्यार्थी दशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदशी जोडले गेले होते. त्यांनी २००६ मध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवडून गेले होते.

२००७ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य झाले. यावेळी त्यांची भेट तेलुगू देशम पार्टीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांच्याशी झाली. त्यानंतर ते कॉग्रेस पक्षात सहभागी झाले. २००९ मध्ये रेवंत रेड्डी यांना टीडीपीच्या तिकीटावर पहिली विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. आणि त्यात त्यांनी सात हजार मतांनी विजय संपादन केला. यावेळी त्यांनी पाचवेळा आमदार राहिलेल्या गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला होता.

२०१४ मध्ये देखील रेवंत रेड्डी हे कोडंगल मधून पुन्हा आमदार झाले. यावेळीही त्यांनी गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला होता. तब्बल १४ हजार ६१४ मतांनी रेवंत यांनी गुरुनाथ यांचा पराभव केला. यावेळी त्यांना तेलंगाणाच्या विधानसभेचा मुख्य नेता म्हणून घोषित केलं गेलं. गेल्या काही दिवसांपासून रेवंत रेड्डी हे वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले होते.

तेलंगाणा उच्च न्यायालयानं त्या प्रकरणात सशर्त अटीसह जामीन मंजूर केला होता. गेल्या महिन्यात त्यांना तेलंगाणा पोलिसांनी अटक केली होती. हैद्राबाद गन पार्कमध्ये निवडणूकीच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती. यापूर्वी त्यांनी तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांना देखील आव्हान दिले होते. वेगवेगळ्या घडामोडींनी रेवंत रेड्डी यांचा राजकीय प्रवास हा वादळी राहिला आहे.

रेड्डी किती कोटी संपत्तीचे मालक?

तेलंगाणा राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांचे नाव घेतले जात आहे त्या रेवंत रेड्डी यांच्या संपत्तीवरुनही यापूर्वी अनेक बातम्या समोर आल्या होत्या. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात रेड्डी यांनी संपत्तीविषयी जी माहिती दिली आहे त्यानुसार त्यांच्याकडे ३२ कोटींची संपत्ती आहे.

त्यामध्ये जंगम मालमत्ता ५.१७ कोटींची असून स्थावर मालमत्ता २४.८८ कोटी रुपयांची आहे. शेती, उद्योग व्यवसाय ही रेड्डी यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत राहिले आहेत.

गुन्ह्यांची संख्याही काही कमी नाही!

रेड्डी यांच्यावर दाखल गुन्ह्यांची संख्याही काही कमी नाही. तेलंगाणामध्ये त्यांच्याविरोधात किंवा निवडणूकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांच्या यादीत रेड्डी यांच्या नावाचा समावेश आहे. तब्बल ८९ गुन्हे रेड्डी यांच्यावर दाखल आहेत.

या गुन्ह्यांमध्ये गंभीर स्वरुपाच्या गुन्हेही आहेत. कोर्टामध्ये १७ केसेस प्रलंबित असून अद्याप त्यावर कोर्टाकडून कोणत्याही प्रकारचा आदेश मिळालेला नाही. रेड्डी हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्य, आंदोलनं आणि आक्रमक कृती यामुळे चर्चेत राहिलेलं व्यक्तिमत्व आहे.