Weather Update : महाराष्ट्रात तापमानाने गाठला उच्चांक, पण ‘या’ भागांत पावसाचा इशारा उन्हाळ्याची चाहूल लागली असली तरी देशभरात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. होळीनंतर उन्हाचा तीव्र चटका जाणवतो, मात्र यंदा होळीपूर्वीच उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. महाराष्ट्रात कमाल तापमान 40 अंश सेल्सियसच्या उंबरठ्यावर पोहोचले असून, किमान तापमानातही वाढ झाली आहे. दुसरीकडे, हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. शनिवारी मुंबईतील तापमान 37 अंश सेल्सियसच्या पुढे गेले. कुलाब्यात तापमान 35 अंश सेल्सियस तर ठाण्यात 37 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुण्यातही तापमान वाढले असून, शिवाजीनगर येथे 36.2 अंश सेल्सियस, तर तळेगाव आणि कर्जतमध्ये 38 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
मराठवाड्यात लातूर (37.0°C), हिंगोली (36.9°C) आणि परभणी (36.6°C) येथे उष्णतेचा प्रभाव जाणवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. पश्चिम महाराष्ट्रात कराड येथे 39.7°C कमाल तापमानाची नोंद झाली, तर सांगलीमध्येही उन्हाचा जोर वाढला आहे. कोकण विभागात पालघर (38.9°C) आणि रत्नागिरी (38.6°C) येथेही तापमान वाढले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सरकल्याने महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.
देशभरात हवामानाचा चढ-उतार दिसून येत आहे. हवामान विभागाने सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, वीज कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राजस्थानमध्ये हवामानात बदल झाल्यामुळे रात्रीच्या थंडीत पुन्हा वाढ झाली आहे. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा काश्मीरमध्ये हिवाळा बहुतांश कोरडा राहिल्याने हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे.
दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांत हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. दिल्लीत हलका पाऊस, तर नोएडामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण देशभरात तापमानात मोठा चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.