Heat wave in Maharashtra : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, रविवारी (ता. ९) सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानातील वाढ कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात थंडी पूर्णतः ओसरली असून, कमाल आणि किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. रविवारी सोलापूर, रत्नागिरी, जेऊर आणि अकोला येथे तापमान ३५ अंशांपेक्षा अधिक नोंदवले गेले. अनेक ठिकाणी तापमान ३२ ते ३५ अंशांच्या दरम्यान असून, उन्हाची तीव्रता वाढली आहे.
हेही वाचा : Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे?
पुणे शहरात कमाल तापमान ३४ ते ३५ अंशांच्या दरम्यान असून, कोरेगाव पार्क आणि मगरपट्टा येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा इशारा दिला आहे. मात्र, किमान तापमान स्थिर राहणार असल्याने रात्री काहीसा दिलासा मिळू शकतो.
हेही वाचा : वीज बिल कमी करण्याच्या बदल्यात पत्नीची मागणी? शेतकऱ्याचा जेईवर गंभीर आरोप!
हवामान विभागानुसार, पुढील आठवडाभर राज्यात आकाश निरभ्र राहील आणि सकाळच्या वेळी काही भागांमध्ये विरळ धुके पाहायला मिळू शकते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
तापमानवाढीची आकडेवारी (रविवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या नोंदी)
ठिकाण | कमाल तापमान (°C) | किमान तापमान (°C) |
---|---|---|
सोलापूर | ३६ | २२.६ |
रत्नागिरी | ३५.४ | २०.५ |
जेऊर | ३५ | १७.५ |
अकोला | ३५ | १९ |
पुणे | ३४.२ | १६.४ |
सांगली | ३४.२ | १८.८ |
सातारा | ३४ | १७.५ |
परभणी | ३४.७ | १८.१ |
बुलढाणा | ३४ | २० |
ब्रह्मपूरी | ३४.४ | १५.५ |
वाशीम | ३४.६ | २०.८ |
सांताक्रूझ | ३४.५ | २० |
छत्रपती संभाजीनगर | ३३.५ | १८.६ |
नाशिक | ३३.७ | १६.४ |
नागपूर | ३२.४ | १५ |
जळगाव | ३२.२ | १६.५ |
धुळे | ३१.८ | ११.८ |
गोंदिया | ३०.६ | १६.४ |
डहाणू | ३०.७ | १८.२ |
नागरिकांना घ्यावयाची काळजी
जास्तीत जास्त पाणी प्यावे, शरीरातील पाण्याची कमतरता होऊ देऊ नये.
सकाळी आणि संध्याकाळी शक्यतो घराबाहेर पडावे, दुपारी उन्हाच्या तीव्रतेत बाहेर जाणे टाळावे.
हलके आणि सैलसर कापड वापरावे.
उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असल्याने डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरणे आवश्यक आहे.
तापमानवाढीचा प्रभाव आगामी काही आठवड्यांत वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. हवामान विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.