‘एआय’मुळे राजकीय पक्षांना टेन्शन; ‘डीपफेक’ बातम्या पसरण्याची भीती

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमधील निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. दुसरीकडे लोकसभा २०२४साठीही सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, राजकीय कुरघोड्या होणं नवं नाही. मात्र यंदा एआय अर्थात आर्टिफिशयल इंटिलजन्सचा गैरवापर ही सगळ्यात मोठी डोकंदुखी ठरण्याची शक्यता आहे. याला कारण ठरतंय ‘डीपफेक’ हे तंत्रज्ञान.

‘डीपफेक’ बातम्यांच्या माध्यमातून अपप्रचार होण्याची भीती प्रत्येक राजकीय पक्षाला सतावत आहे. केंद्र सरकारनेही असं होण्याची शक्यता असल्याचं म्हणत याबाबत तयारी सुरू केली आहे. डीपफेक व्हिडिओ तयार करणे आणि शेअर करणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘आयटी नियम 2021’च्या ट्रान्सेबिलिटी तरतूद करण्यात येणार आहे. यामुळे ज्या सगळ्यात आधी ज्या व्यक्तीने डीपफेक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याची ओळख सरकारला देणं मीडिया कंपन्यांना बंधनकारक असेल.

काय आहे डीपफेक?
फोटोशॉप किंवा व्हिडिओ एडिटिंगच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुसऱ्याचा चेहरा लावणं ही गोष्ट आता जुनी झाली आहे. एआयच्या मदतीने आता डीपफेक व्हिडिओ तयार करता येतात. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा केवळ चेहराच नाही; तर आवाज, हावभाव, बोलताना तोंडाची होणारी हालचाल अशा सर्वच गोष्टी कॉपी करता येतात.

इंडिया आघाडीचं मेटा-गुगलला पत्र
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ या दलाने देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील चौदा नेत्यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात निवडणुकीदरम्यान तटस्थ राहण्याचा आणि भाजपच्या बाजूने न झुकण्याचा आग्रह करण्यात आला होता.