चौथ्या रेल्वे लाईनची चाचणी यशस्वी, ताशी 120 वेगाने सहा डब्यांची स्पेशल ट्रेन धावली

भुसावळ : मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी भुसावळ-भादली दरम्यानच्या चौथ्या रेल्वे लाईनची ताशी 120 वेगाने स्पेशल गाडी चालवून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याने आगामी काळात आता अप-डाऊन मार्गावरील प्रत्येकी दोन गाड्या सुरळीत धावण्यास मदत होणार असून त्यामुळे आऊटरला गाड्या थांबणे बंद होवून वेळेत प्रवासी गाड्या इच्छितस्थळी पोहोचणे सुलभ होणार आहे. दरम्यान, याच काळात यार्ड रीमोल्डींगमुळे 30 व 31 मार्च रोजी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतल्याने तब्बल 30 रेल्वे गाड्या रद्द केल्याने प्रवाशांचे रणरणत्या उन्हात चांगलेच हाल झाले तर एस.टी.प्रशासनाने ही संधी कॅश करीत अर्ध्या तासाला जळगावसाठी बस सेवा सुरू करीत लाखोंची कमाई केली तर लांब पल्ल्यासाठीदेखल बसेस सोडण्यात आल्याने प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला.

सहा डब्यांची विशेष गाडी धावली
चौथ्या रेल्वे लाईनीसाठी मुख्य सेफ्टी आयुक्त मनोज अरोरा यांनी रेल्वे रूळ, इलेक्ट्रीक पोल, पॉइंट, वाघूर पूल, पूलाखालील बांधकाम, सिग्नल यांची पाहणी केली. प्रसींग चिफ अ‍ॅडमीशन प्रमुख विवेककुमार गुप्ता, डीआरएम एस.एस. केडीया, उपविभागीय अभियंता पंकज धावरे, वरीष्ठ अभियंता (समन्वयक) तरुणकुमार दंडोतीया यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. चौथ्या लाईनीची चाचणीची प्रक्रिया गुरुवारी सकाळी 9.30 पासून सुरू झाल्यानंतर दुपारी दिड वाजता पहिल्या टप्प्यातील पाहणी झाल्यानंतर दुपारी 3.30 वाजता भुसावळ ते भादली या मार्गावर सहा डब्यांची विशेष गाडी ताशी 120 वेगाने चालवण्यात आली. भुसावळ ते भादली हे अंतर 11 मिनिटात पार केल्यानंतर गाडी जळगावात नेण्यात आली.

गाड्या वेळेत धावणार
भुसावळ-जळगाव दरम्यान तिसर्‍या व चौथी लाईनीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक अप-डाऊन मार्गासाठी दोन लाईनींचा आगामी काळात वापर होणार असल्याने भुसावळसह जळगावला आऊटरला गाड्या थांबणे बंद होवून नियोजन वेळेत गाड्या मार्गस्थ होणार आहेत.

गुरुवारी या गाड्या झाल्या रद्द
गुरुवारी अमरावती-पुणे, सुरत-अमरावती एक्स्प्रेस, दौंड-भुसावळ एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, अहमदाबाद-नागपूर प्रिमीयर एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, मुंबई-जबलपूर एक्स्प्रेस, बडनेरा-भुसावळ मेमू, भुसावळ-इटारसी मेमू, सुरत-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-कटनी एक्स्प्रेस आीद गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

 शुक्रवारी या गाड्या रद्द
शुक्रवार, 31 रोजी भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, भुसावळ-बडनेरा मेमू, भुसावळ-सुरत एक्स्प्रेस, देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-देवळाली एक्स्प्रेस, कटनी-भुसावळ एक्स्प्रेस, नागपूर -पुणे एक्स्प्रेस, भुसावळ-नागपूर मेमू, नागपूर-भुसावळ मेमू, वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस तसेच बुधवार, 29 या दिवशी जबलपूर-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे या शिवाय 17 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे तर अनेक पाच गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या.