नाना पटोलेंमुळे कोसळले ठाकरे सरकार?

मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर संकटांची मालिका सुरु झाली, मविआ सरकार कोसळण्यास हे प्रमुख कारण असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामधून केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता, त्यामुळे मविआ सरकार अस्थिर झालं, असा दावा यांनी केला आहे. पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकार कोसळलं नसतं म्हणत पटोलेंवर वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय. दरम्यान, गैरसमज पसरवणं खपवून घेतलं जाणार नाही या शब्दांत नाना पटोलेंनी इशाराच दिला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, राजकीय अस्थिरता निर्माण झाली त्यावेळेस नाना पटोले यांच्यासारखा एक सशक्त माणूस अध्यक्षपदाच्या खुर्चीवर होते, त्यांनी सभागृह उत्तम रितिने चालवलं, एक अभ्यासून आणि मजबूत अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे बघत होता, अशा वेळेस राजीनामा दिल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आणि सरकारला पायऊतार व्हावं लागलं, असं वडेट्टीवार यांनी म्हटंल. त्यावेळेस अनेकांच्या भावना होत्या की नाना पटोले यांनी राजीनामा द्यायला नको होता. कदाचित सरकार त्यावेयळेस टिकलं असतं अशी भावना अनेकांची होती असंही वडेट्टीवर यांनी सांगितलं.

सामनामधून नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नाना पटोले यांचा राजीनामा देण्याचा निर्णय शहाणपणाचा निर्णय नव्हता, पटोले अध्यक्ष असते तर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आज निर्माण झालेले एक पेच प्रसंग टाळता आले असते, असं शिवसेनेने म्हटलंय, तसंच पक्षांतर करणार्‍यांना जागेवरच अपात्र ठरवणं सोपं झालं असतं, पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही, त्याचाच फायदा पुढे खोकेबाज आमदार आणि त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीला झाला, असा आरोप शिवसेनेने केला आहे.