बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे – शिंदे गटामध्ये राडा; दोन्ही गटांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

मुंबई : शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) ११ वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने काल (१६ नोव्हेंबर) सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील नेत्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमल्यामुळे बराच वेळ तिथे तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर राज्यभरातून लाखों शिवसैनिक येत असतात. त्यामुळे शिवतीर्थावर चोख बंदोबस्त ठेवावा लागतो, तसेच शिवसैनिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध कराव्या लागतात. या सगळ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी सायंकाळी शिवतीर्थावर गेले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्तेही तेथे पोहचले. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमल्यानंतर दोन्ही गट आमने सामने आले. शिवतीर्थावर पोहोचल्यावर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांकडे पाहून घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचं मोठ्या राड्यात रुपांतर झालं.

मुख्यमंत्र्यांची ठाकरे गटावर टीका

या राड्यावर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “शिवाजी पार्क येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. कारण बाळासाहेबांचा स्मृतीदिन शांततेत साजरा होतो. महाराष्ट्रातून कार्यकर्ते येतात, नतमस्तक होतात आणि आपआपल्या गावी निघून जातात. कोणत्याही परिस्थितीत संघर्ष नको, स्मृतीदिनाला गालबोट लागू नये म्हणून मी, आमदार, खासदार शांतपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झालो. दर्शन घेतलं आणि आम्ही निघून गेलो. इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी निघत असताना उबाठाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक राडा करणं, घोषणाबाजी करणं, महिलांना धक्काबुक्की करणं ही बाब अतिशय निंदनीय आहे. “

संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

काल (१६ नोव्हेंबर) स्मृतीस्थळावर येऊन ज्या बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, नौटंकी केली त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडला, बाळासाहेबांच्या भूमिकेला तिलांजली दिली, ज्यांनी पाठित खंजीर खुपसला ते शिवसैनिक कसे काय? बाळासाहेब ठाकरे सर्वांचेच आहेत. त्यांच्या स्मृतीस्थळावर प्रत्येकाने यायला हवं. पण काल ज्यांनी येऊन नौटंकी केली त्यांना आम्ही शिवसैनिक मानणार नाहीत. तुमच्या मनात बाळासाहेबांविषयी श्रद्धा नाही आणि तुम्ही स्मृतीस्थळी येऊन दर्शन घेता. जे शिवसैनिक निष्ठावंत आहेत, जे बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहेत, त्यांनी विरोध केला असेल तर तो महाराष्ट्राला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.