---Advertisement---
Dhule Crime : मारहाण प्रकरणाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या थाळनेर पोलिसांनी अवैध दारू विक्रीचा भांडाफोड केला आहे. तपासादरम्यान, त्यांनी एका हॉटेलवर छापा टाकून तब्बल ७ लाख ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी हॉटेल मालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थाळनेर गावातील सुमारे २० ते २५ जणांनी बीएसएफ जवान सुनील पोपट पारधी यांना मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ संशयित आरोपींना अटक केली, तर १० ते १२ आरोपी अजूनही फरार आहेत.
याच गुन्ह्यातील एक संशयित आरोपी अनिल ऊर्फ पप्पू कोळी याचा शोध घेण्यासाठी थाळनेर पोलिसांचे एक पथक हॉटेलवर पोहोचले. पथक हॉटेलमध्ये पोहोचले असता त्यांना अवैध दारु विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
या अवैध दारू विक्रीप्रकरणी हॉटेलचा मालक पप्पू ऊर्फ अनिल सुभाष कोळी आणि करण भाया पावरा या दोघांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थाळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, हर्षल पाटील, तसेच पोलिस कर्मचारी रावसाहेब पाटील, उमाकांत वाघ, धनराज मालचे, मुकेश पावरा आणि आकाश साळुंखे यांचा समावेश होता.