नंदुरबार : शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अक्कलकुवा येथे सोमवार, ३१ मार्च रोजी जाहीर आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी यांनी केले.
राज्यात ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार विजयी झालेले आहेत. अशा मतदारसंघांमध्ये मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आभार सभा घेत आहेत. सोमवार, ३१ रोजी दुपारी १ वाजता अक्कलकुवा येथे जाहीर आभार सभा होईल. जाहीर सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. सभेच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी यांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेतली.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदार निवडून येईल असा कोणीही विचार केला नव्हता. आमश्या पाडवींना आमदार करून मतदारांनी किमया करून जनतेने शिवसेनेवर विश्वास व्यक्त केल्याचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांचे मांडणी
या वेळी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांची मांडणी एकनाथ शिंदे यांच्याजवळ करण्यात येईल. अक्कलकुवा तालुक्यातील काही सिंचनाचे प्रश्न आहेत ते मांडण्यात येतील. देहली प्रकल्प, तापी बुराई प्रश्नावर सुद्धा हात घालण्यात येईल. तोरणमाळच्या विकासासाठी पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे.