जळगाव : बाल साहित्य विश्वात औत्सुक्याचा व आकर्षणाचा विषय ठरत असलेल्या कुमार साहित्य संमेलनाचे सुप वाजले आहे. विवेकानंद प्रतिष्ठानच्या खान्देश बालसाहित्य मंडळातर्फे प्रतिवर्षी आयोजित होणारे ‘7 वे कुमार साहित्य संमेलन’ यंदा 16 डिसेंबर रोजी होणार असल्याचे प्रतिष्ठानतर्फे जाहिर करण्यात आले आहे.
विद्यार्थी दशेतच साहित्याची रुची निर्माण व्हावी तसेच बाल साहित्य चळवळ वृद्धींगत व्हावी या हेतूने विवेकानंद प्रतिष्ठान च्या वतीने प्रतिवर्षी कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. खान्देशातील विविध शाळांचे विद्यार्थी या संमेलनात सहभागी होत असतात. या आधी झालेल्या संमेलनात डॉ. विजया वाड, डॉ. अनिल अवचट, वीणा गवाणकर, दीपा देशमुख, एकनाथ आव्हाड यांसारख्या ज्येष्ठ बाल साहित्यिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
छत्रपती शिवरायांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर या वर्षीचे संमेलन आधारित असणार आहे. एक दिवसीय संमेलनात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा व शाळाबाह्य तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील साहित्यप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व साहित्य क्षेत्रात रुची असलेले साहित्यप्रेमी सहभागी होणार आहे. या संमेलनात काव्यवाचन, कथाकथन, परिसंवाद, अभिवाचन तसेच ज्येष्ठ साहित्यिकांची प्रकट मुलाखत इत्यादी सत्र आयोजित केले जाणार आहे. काव्यवाचन सत्रांत स्व-रचित किंवा संग्रही असलेल्या कुठल्याही काव्याचे वाचन करता येणार आहे. कथा कथन सत्रांत छत्रपती शिवरायांच्या व मावळ्यांच्या प्रेरक कथा सादर करता येतील.
अभिवाचन सत्रात शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांचे अभिवाचन समूह स्वरुपात करता येईल. परिसंवाद सत्रांत “आजच्या युगात शिवरायांचे विचार मागदर्शन कसे?” या विषयांवर चर्चा करता येणार आहे. या सोबतच ज्येष्ठ साहित्यिकांचा सहवास व प्रकट मुलाखत विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. साहित्य संमेलनातील सादरीकरण उत्तम व्हावे यासाठी दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. निवड फेरीचे आयोजन विवेकानंद प्रतिष्ठान,सुयोग कॉलनी येथे करण्यात आले आहे.
वरील सर्व प्रकारात रुची असलेल्या साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी 989044402, 9766988173 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.