तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील जुन्या एमआयडीसीतील स्वाती तायडे या युवतीला साधारण १ लाख २४ हजारांना गंडा घातला आहे. बीटूसी स्मार्ट एक्सप्रेस कुरिअर सर्व्हीस कंपनीच्या लिंकवर फॉर्म भरायला सांगून सायबर भामट्याने युवतीची फसवणूक केली आहे.
स्वाती तायडे ही युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून १ एप्रिल रोजी तिने ऑनलाइन साडी बुक केली होती. ही साडी ३ एप्रिल रोजी बी टू सी स्मार्ट एक्सप्रेस कुरिअर सर्व्हीस कंपनीद्वारे मिळणार होती. मात्र ७ एप्रिल तारीख येऊनही साडी मिळाली नसल्याने स्वाती तायडेने कुरिअर कंपनीच्या संकेतस्थळावर साडीच्या डिलिव्हरी बाबतचे स्टेटस् चेक केले. त्यावेळी तिला डिलेव्हरी अदयाप पेडींग असल्याचे दिसून आल्याने कुरिअर कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्या व्यक्तीने स्वातीला तुमचा पत्ता सापडत नसल्यामुळे पार्सल पेडींग दिसत असल्याचे सांगत कंपनीच्या लिंकवर जाऊन एक फॉर्म भरण्यास सांगितला. त्यानुसार स्वातीने संपूर्ण फॉर्म भरला.
दरम्यान, फॉर्म भरल्यानंतर काही मिनिटानंतर स्वातीला तिच्या खात्यातून पैसे कपातीचे मेसेज प्राप्त झाले. क्रेडीट कार्ड आणि बँक खात्यातून पैसे कपातीचा मेसेज आल्यानंतर स्वातीला शंका निर्माण झाली. स्वातीने ऑनलाइन खात्यातील रक्कम तपासल्यानंतर त्यातील रक्कम कमी झालेली दिसून आली. काही वेळानंतर पुन्हा तिने ऑनलाइन बॅलेन्स तपासल्यानंतर तब्बल १ लाख २४ हजार रूपये खात्यातून गायब झालेली दिसून आली. अखेर बुधवारी तिने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून भामट्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार सायबर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.