---Advertisement---
धुळे : शिक्षणासाठी येणाऱ्या काही मुलींचा छुप्या पद्धतीने पाठलाग करून छेड काढणे आणि मारहाण केल्याप्रकरणी मुख्य न्याय दंडाधिकारी के.बी. चौगुले यांनी नऊ आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी पीडित मुलींना न्याय मिळावा, यासाठी सरकार पक्षातर्फे अॅड. राकेश प्रभाकर चौधरी यांनी बाजू मांडली.
शाळकरी मुलींची छेड काढल्याप्रकरणी १५ ऑक्टोबर २०१४ रोजी सार्वे गावातील लोकांनी आरोपींना विरोध केला होता. या रागातून सार्वे गावातील काही लोक लहान मुलीला उपचारासाठी रिक्षाने सोनगीर येथे घेऊन जात असताना, आरोपींनी रिक्षा अडवली व रिक्षातील लोकांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी सोनगीर पोलिसात भादंवि १४३, १४७, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३५४-डी (१) (आय) आणि १४९ नुसार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते
त्या आरोपींना अशी सुनावण्यात आली शिक्षा
या प्रकरणातील तीन मुख्य आरोपी जुबेर शेख अब्दुल शेख मणियार, शोएब शेख दौंड शेख मुसा कुरेशी आणि लाला शेख अजीम शेख कुरेशी यांना दोषी ठरविण्यात आले. या तिघांना भारतीय दंड विधान कलम १४३, १४७, ३४१, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्याचबरोबर, कलम ३५४-डी (१) अंतर्गत त्यांना एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास, त्यांना एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल.
सहा आरोपींना शिक्षा
इतर सहाआरोपी सज्जाद खान, नजीम शेख, शहीद शेख, शाहरुख शेख, मुजाहिद खान फारुख खान आणि सद्दाम खान कुरेशी यांना भारतीय दंड विधान कलम १४३, १४७, ३४१, ३२३, ५०४, ५०६, १४९ अंतर्गत दोषी धरून सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गीते हे तपासी अधिकारी होते.