१२ आमदारांच्या नियुक्तीवर दुसर्‍याच दिवशी होणार होती सही, मात्र; कोश्यारींचा गौप्यस्फोट

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं नोव्हेंबर २०२० मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ सदस्यांनी नावं विधानपरिषदेवर नामनिर्देशित करण्यासाठी पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी ती मंजूर केली नव्हती. त्यामुळे, राज्यपालांच्या भूमिकेवर कायमच प्रश्न चिन्ह उभे राहत होते. यासंदर्भात आता, राज्यपाल पदाच्या खुर्चीवरुन पायउतार झाल्यानंतर कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांची नियुक्ती का केली नाही, याबाबत मोठा गौप्यस्पोट खुद्द कोश्यारी यांनी केला आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना कोश्यारी म्हणाले की, मला महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने येऊन पत्र दिलं. मला ५ पानांचं पत्र दिलं होतं, त्यामध्ये, राज्यपालांना, हा कायदा, तो कायदा. तसेच, १५ दिवसांत ह्या नियुक्त्या करा, अशा धमकीवजा संदेश होता. मुळात पण त्या पत्राच्या दुसर्‍याचदिवशी मी नियुक्त्या करणार होतो, मात्र पत्रातील धमकीच्या भाषेमुळे मी सही केली नसल्याचा गौप्यस्फोट भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे संत माणूस
उद्धव ठाकरे संत माणूस आहेत, कुठे राजकारणात फसले, त्यांचे सल्लागारच असा उठाठेव करत, ते शकुनीमामाच्या फेर्‍यात अडकले. शऱद पवारांसारखे राजकारणी नाहीत, त्यांना पवारांसारखा अनुभव नाही, त्यांना ट्रीक्सही माहिती नाही, असे म्हणत राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वावर भाष्य केलं.