डाकीणचा संशय! चक्क स्मशानभूमीतील राख घातली खाऊ, कुटुंबाने कथन केला प्रसंग

नंदुरबार : डाकीण असल्याचा संशयातून एका महिलेला मारहाण करत चक्क स्मशानभूमीतील राख खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सातपुड्याचा दुर्गम भागात शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धेतून आजही डाकीण प्रथा कायम असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होतय.

अक्कलकुवा तालुक्यातील ओघाणीचा चापडा पाडा येथील एक ५० वर्षीय महिला व तिच्या पतीला मांत्रिकाने व संशयितांनी डाकीण ठरवून स्मशानात जळालेल्या प्रेताची राख खाऊ घातल्याचा अघोरी प्रकार घडला होता. याप्रकरणी मोलगी पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपी ओजमा नवसा वसावे (७२) गुलाबसिंग ओजमा बसावे (२८) इल्या ओजमा वसावे (३५) खेमा नवसा वसावे (४३) चंद्रसिंग खेमा वसावे (२२) रा. ओघाणी चापडा पाडा (ता. अक्कलकुवा) यांना मोलगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावित यांच्या पथकाने अटक केली. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, सातपुड्याच्या दुर्गम भागात शिक्षणाचा आणि आरोग्य सेवेचा अभाव आणि त्यातच अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने डाकीण सारखी प्रथा आजही कायम आहे. पाड्या वस्तीमध्ये कोणी आजारी पडले किंवा मयत झाले तर एखाद्यावर संशय घेऊन डाकीण ठरवण्याचे प्रकार घडत असून येथील आरोग्य सेवा चांगल्या करण्याची गरज आहे.

एकीकडे आपण चंद्रावर चांद्रयान पाठविले मात्र आजही दुर्गम भागात शिक्षणाचा अभावी डाकीण प्रथा कायम असल्याचे वास्तव आहे. महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत असताना आजही दुर्गम भागात अंधश्रद्धा कायम असल्याने आधुनिक युगात जनजागृती करण्यात कुठेतरी कमी पडल्याचे वास्तव आहे.