वेध
– प्रफुल्ल व्यास
‘पाहतो काय रागानं ओव्हरटेक केला वाघानं’, ‘जलो, मगर दीप समान’, ‘आई-वडिलांचा आशीर्वाद’, ‘देव बरोबर करते’ पासून विविध देवी-देवतांची नावं-आशीर्वाद आणि ‘फिर मिलेंगे’ वगैरे वगैरे ट्रक वा ऑटोवर हमखास वाचायला मिळतं. ट्रकवरील काही काही वाक्य वाचून वेगात वाहन चालवत असतानाही हसू आल्याशिवाय राहत नाहीत. काही वाहनांवर तर घरातल्या सा-या भावंडांची नावं लिहिली जातात. एकंदरीत वाहनं आणि नावं एक समीकरण झाले आहे. वाहनांच्या नंबर प्लेटवर काहीही लिहिण्याची आरटीओ विभागाची परवानगी नसतानाही आकड्यांचा खेळ करून राजा, राम, शिवाजी, जीवन त-हेत-हेच्या युक्त्या काढून लक्ष केंद्रित केले जाते. चालकांचा साहित्यासोबत कितपत संबंध असू शकतो हे सांगणे कठीणच! पण, तरीही ही वेगवेगळी वाक्य वाचून ट्रक चालक किंवा मालकाच्या बुद्धीची कीव कराविशी वाटते. एका पेट्रोलच्या टँकरवर लिहिले होते- ‘पप्पा जल्दी घर आणा’ आणि त्या टँकरचा जोरदार अपघात होतो. त्यात चालकाचा मृत्यू होतो आणि अपघात बघणा-यांच्या डोळ्यात तेवढेच वाक्य सलत राहते. काही वाक्य तेवढीच भावनाप्रधान डोळ्यातून पाणीही पाडणारीही असतात.
एकंदरीत त्या वाहन चालकांचा म्हणा वा मालकाचा तसा थेट या साहित्याशी संबंध नसतो. पण, निर्जन प्रवासात मागे वाहन चालणा-यांंना ही वाक्य ब-याचदा चर्चेला मुद्दा देऊन जाते. परंतु, ‘पुणे तिथे काय उणे’ या युक्तीने पुन्हा पुणेकरांच्या डोक्याची कमाल मान्य करावीच लागेल पुण्यातील बारावी नापास असलेल्या प्रशांत कांबळे या युवकाने कोरोनानंतर ऑटो चालवण्याचा व्यवसाय सुरू केला. आता तुम्ही म्हणाल ऑटो चालवणे हा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय कित्येक जण करतात; त्यात काय नवल? आहे. नवलच आहे! पुण्यात होत असलेल्या कोंडीत तासन्तास अडकून पडताना निव्वळ हॉर्न वाजवत बसणे किंवा इकडे-तिकडे पाहण्याशिवाय पर्याय नसतो.प्रवासी बोलका असेल तर तो काही दोन-चार वाक्य बोलेल नाही तर मख्ख! असा दिनक्रम या ऑटोचालकांचा असतो. पण, प्रशांत कांबळे युवकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य पक्के डोक्यात फिट केले. त्याने चक्क स्वत:च्या मालकीच्या एम. एच. १४ एच.एम. ०५२३ क्रमांकाच्या ऑटोत चक्क ग्रंथालयच तयार केले. त्याच्या ऑटोतील कप्प्यात पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, बाबा आमटेंसह अनेक प्रबोधनात्मक पुस्तकं आहेत.
मोबाईलच्या दुनियेत वाचनाची आवड कमी झाल्याने त्याने एका मित्राच्या मदतीने हा नवीन प्रयोग सुरू केला. मराठी भाषा हळूहळू लुप्त होत असल्याने त्याच्या रिक्षात मराठीच पुस्तकं आहेत. दूरचा प्रवास आणि वाहतूक कोंडी असली की प्रवासी कंटाळून का होईना पुस्तक हाती घेतात आणि आपला उद्देश साध्य होतो, असे या ऑटोचालकाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे रात्री कॉलनीत रिक्षा उभी केल्यानंतर रिक्षातील पुस्तकं काढली जात नाहीत. कॉलनीतील काही वाचनवेडे पुस्तकं काढून घेऊन जातात आणि दुस-या दिवशी तुमच्या ‘ओपन ऑटो लायब्ररी’तून पुस्तक नेल्याची तेवढी माहिती देऊन परतही केले जाते. पुस्तकं वाचलीच पाहिजेत. पुस्तकाने नैराश्य कमी होते. आताच्या मुलांना थोडं काही अडलं तर ते थेट गुगल बाबाला विचारतात. मुलांचीच काय, मोठ्या मोठ्यांची टीव्ही आणि मोबाईलच्या दुनियेत वाचनाची आवड लुप्त होत जात असताना प्रशांत कांबळे या पुण्यातील ऑटो चालकाने ऑटोत सुरू केलेली लायब्ररी हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील भिलार हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आता संत ज्ञानदेवांचे नेवासाही पुस्तकांचे गाव म्हणून नावारूपाला येणार आहे. वाचल्याशिवाय पर्याय नाही, हे सत्य प्रत्येकाला स्वीकारावेच लागेल. या वाचनासाठी ऑटोतील लायब्ररी पथदर्शकच ठरावी. बरं, तो ऑटो चालक दुस-यांनाच पुस्तकं वाचायला प्रवृत्त करतो असे नव्हे तर रिकाम्या वेळेत तोही या पुस्तकांमध्ये रमून जातो. वर्धा जिल्ह्यातील ऑटो चालक जरा वेगळा आहे. पैशांसाठी मरमर करणा-यांना बाजूला ठेवत त्याने देशसेवेची नवीन युक्ती शोधून काढली. सेलू तालुक्यात असलेल्या मोर्चापूर येथील दिलीप चैनलाल नागपुरे या अल्पशिक्षित युवकाने आपल्या एम.एच. ३२ एके ०४०३ क्रमांकाच्या ऑटोत सैनिक आणि पोलिसांना मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. ब-याचदा ज्यांच्याकडे समाज तुच्छतेने बघते ते मात्र पथदर्शी ठरतात.
९८८१९०३७६५