---Advertisement---
गुजरात : महिसागर नदीवरील पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून, बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू, तर ३ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, दोन ट्रकसह ५ वाहने नदीत बुडाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक प्रशासनासह अग्निशमन विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून, गोताखोरांच्या मदतीने नदीत पडलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. पाड्रा पोलिस निरीक्षक विजय चरण यांनी सांगितले की, सकाळी ७.३० वाजता महिसागर नदीवर बांधलेल्या पुलाचा एक भाग कोसळला आणि अनेक वाहने नदीत पडली. दोन ट्रक आणि दोन व्हॅनसह अनेक वाहने नदीत पडली. आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.
---Advertisement---
मिळालेल्या माहितीनुसार, सौराष्ट्रातून येणारी मोठी वाहने टोल टॅक्स टाळण्यासाठी या पुलाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. तथापि, वडोदरा जिल्हाधिकाऱ्यांच्या मते, सध्या वाहतुकीसाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. महिसागर नदीवर बांधलेला हा पूल ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. गंभीरा पूल सुसाईड पॉइंट म्हणूनही ओळखला जातो. त्याची दुरुस्ती आवश्यक होती, परंतु त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पुलाच्या शेजारी नवीन पूल बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. नवीन पुलाला मंजुरी मिळूनही त्याचे काम सुरू झालेले नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वीही कोणतीही दक्षता दाखवण्यात आली नाही. पूल जीर्ण असूनही तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला नाही. हा पूल बऱ्याच काळापासून हलत होता, त्याबद्दल सतत तक्रारी करण्यात आल्या, मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.