नंदुरबार : आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदार संघात गेल्या दोन निवडणुकांत भाजपच्या डॉ. हिना गावित या मोठ्या मताधिक्याने विजयी होत आल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत त्यांना पाच मातब्बर उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे. त्यामध्ये पहिले आहेत महाविकास आघाडीचे ऍड. गोवाल पाडवी, तर चार विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी मैदानात उतरले आहेत. त्यापैकी तिघे अपक्ष, तर एक भारतीय आदिवासी पार्टीकडून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे यंदाची लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
नंदुरबार लोकसभा मतदार संघात, तोच व त्याच तालुक्यांचा समावेश मात्र वाढती लोकसंख्या आणि गावांसह शहरांच्या विस्तारामुळे मतदारांसोबतच मतदान केंद्रांचाही विस्तार झाल्याने आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदान केंद्रांची संख्या २११५ तर मतदारांची संख्या १९ लाख ५८ हजार ३५३ एवढी झाली आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आजच्या नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यांसह शिरपूर व साक्री तालुक्याचाही समावेश आहे. धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतरही धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री तालुका मतदारसंघाचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समावेश जैसे थेच आहे.
नंदुरबार लोकसभा मतदार संघ १९९९ पर्यंत धुळे जिल्ह्यात समाविष्ट होता. त्यात आताचा नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा-तळोदा व अक्कलकुवा-अक्राणी (धडगाव) या चार विधानसभा मतदारसंघाचा तर आताच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर मतदारसंघांचा समावेश होता. असे सहा विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्येच्या गोळा बेरजेने नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निर्मिती केली गेली आहे.
मागच्या (२०१९) निवडणुकीत डॉ. हिना गावित यांना 5 लाख 84 हजार 828 मते मिळाली होती. मात्र, मतदारांचा वाढलेला टक्का आणि आता बदललेली राजकीय समीकरणे यामुळे येथील चित्र पूर्णपणे बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये झालेली फूट, ठाकरे गटाचा महाविकास आघाडीला मिळालेला पाठिंबा आणि चुरशीची तिरंगी लढत यामुळे विजयाचे चित्र काहीसे धूसर मानले जात आहे.