नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांना आज सुनावनी दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण विधान केलं आहे. सरकार पडेल असे कुठलेही कृत्य राज्यपालांनी करायला नको होतं. ३ वर्षात तुम्ही एकही पत्र लिहिले नाही आणि एका आठवड्यात ६ पत्रे कशी?, ३ वर्ष तुम्ही आनंदाने सरकार चालवले मग एका कारणासाठी सरकार पाडले का? राज्यपालांनी सरकार पाडण्यात मदत करू नये. राज्यपालांनी आपल्या मर्यादेत राहायला हवं असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं.
सरन्यायाधीश म्हणाले की, ३ वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? जीवाला धोका म्हणून बहुमत चाचणी बोलावणं अयोग्य आहे. महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत राज्य. या राज्यात अशी घटना घडणे हे निराशाजनक. ३४ आमदारांकडून गटनेत्याची निवड हा मुद्दा योग्य. बहुमत चाचणीसाठी पत्र लिहिणं अयोग्य आहे. अधिवेशन पुढे असताना बहुमत चाचणी बोलावली असं दिसते. राज्यपालांनी अशा परिस्थितीत बहुमत बोलावणे हे सरकार पाडण्याचं पाऊल असं निरिक्षण कोर्टाने नोंदवले आहे.
मतभेद कुठल्याही पक्षात असू शकतात पण त्यावेळी बहुमत चाचणी बोलावून एकप्रकारे राज्यपालांनी सरकार पाडण्यात मदत केली. अशा परिस्थितीपासून राज्यपालांनी दूर राहायला हवं होते. आम्ही जे प्रश्न विचारतोय तेच आमचे मत असेल असं नाही. राज्यपालांनी पहिला प्रश्न हा विचारायला हवा होता ३ वर्ष सगळं सुरळीत होते मग एका रात्रीत असे का घडले असं त्यांनी विचारायला हवं होते असं मत चंदचूड यांनी मांडले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.