जळगाव : सिगारेटसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने वडीलांशी हुज्जत घालून समजविण्यासाठी आलेल्या आईवर चाकूने वार केल्याची घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा-हुडको येथे घडली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलगा देवेंद्र गजानन साळूंखे (वय २२) याच्याविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, प्रमिला साळूंखे या पिंप्राळा-हुडको येथे पती गजानन, मोठा मुलगा देवेंद्र व लहान मुलगा कार्तिक यांच्यासह वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास देवेंद्र याने वडीलांकडे सिगारेटसाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्याने वडीलांशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. नंतर त्याच्या आईने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला देखील त्याने शिवीगाळ करून तुम्ही मला त्रास देतात, तुम्हाला पाहून घेईल अशी धमकी देवून खिशात लपविलेला छोटा चाकू काढून त्याने आईवर वार केला. यात त्या जखमी होवून खाली कोसळल्या. या घटनेनंतर देवेंद्र हा तेथून पळून गेला. प्रमिला यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर दुपारी त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यावरून मुलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.