---Advertisement---
पिंपळनेर : हातात भगवे झेंडे, डोक्यावर टोपी अन् मुखी जय श्री रामाचा जयघोषाने संपूर्ण पिंपळनेर शहर दुमदुमले. शहरात श्रीराम मंदिर अक्षदा कलश यात्रा मोठ्या उत्साहात झाली. श्री राम मंदिर अयोध्या नगरी येथून पिंपळनेर शहरात आलेल्या पवित्र अक्षदा कलशाची शोभायात्रा सोमवारी सकाळी श्रीराम मंदिर, टेंभरोड, इंदिरानगर हनुमान मंदिर, पोलीस स्टेशन, बस स्टॅन्ड, विश्वनाथ चौक, होळी चौक, भोई गल्ली, महाराणा प्रताप चौक,नेताजी सुभाषचंद्र बोस चौक,नाना चौक,न्हावी हुडा, मुरलीधर मंदिर, एखंडे गल्ली,गोपाळ नगर, बाजारपेठ,गांधी चौक,माळी गल्ली,श्रीराम मंदिर या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.
शोभायात्रा मार्गात भव्य रांगोळी काढण्यात आली होती. तर सर्व नागरिकांनी अक्षदा कलशाचे स्वागत व पूजन केले. श्री रामभक्तांकडून होणारा श्रीरामाचा जयघोष व टाळ-मृदुंगाच्या तालावर श्री रामभक्त तल्लीन झाले होते.तर प्रभू श्री रामाच्या जयघोषाने पिंपळनेर नगरी दुमदुमली.या शोभायात्रेत शेकडो रामभक्त सहभागी झाले होते.









