---Advertisement---
नगरदेवळा ता पाचोरा : येथून जवळच असलेल्या आखतवाडे ते नेरी या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच मागील अनेक महिन्यापासून रस्त्यावर खडीचे ढिगारे पडून असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असून पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. खाडीच्या ढिगाऱ्यातील खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली असून यातून एसटी बसला मार्गक्रमण करता येत नाही, या सर्वांचा प्रवाशांना प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीचे केव्हा काम मार्गी लागून या त्रासातून आमची केव्हा सुटका होईल असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
खडीच्या ढिगाऱ्यामुळे अरुंद झालेल्या या रस्त्यावर जेव्हा दोन बस समोरासमोर येतात तेव्हा त्या पुढे जाऊ शकत नाहीत. तेव्हा वाहकांना खाली उतरून चालकांना दिशा दाखवून बसेस मागेपुढे करून बराच प्रयत्न करून मार्ग काढावा लागतो. यात बराच वेळ लागत असल्याने गाडीला विनाकारण खूप उशीर होत असतो. या परिसरातून सकाळच्या बसने चाळीसगावला जाऊन तिथून धुळे-दादर एक्सप्रेसने मुंबईला जाणाऱ्या अनेक प्रवाशांना या प्रकारांमुळे उशीर झाल्याने त्यांची गाडी निघून जाते. या प्रवाशांना चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर तासनतास वाट बघून पुढच्या ट्रेनने प्रवास करावा लागतो.
गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यावरील खड्डे व खडीचे मोठमोठे ढिगारे यामुळे बस चालक या मार्गावर बऱ्याचदा बस आणणे टाळायला लागले आहेत. त्यामुळे स्वतःच ठरवून नेरी व आखतवाडे येथील ग्रामस्थांनी जेसीबी लावून स्वखर्चातून या रस्त्यावरील अनेक मोठमोठ्या खडीच्या ढिगाऱ्यातील खडी इतरत्र सरकवून रस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा संपूर्ण मार्गावर असलेले खडीचे ढिगारे प्रचंड त्रासदायक ठरत आहेत. चाळीसगाव आगाराची नगरदेवळा मुक्कामी बस गेल्या आठ दिवसांपासून या ढिगार्यांच्या त्रासामुळे चाळीसगाव आगाराने रद्द केलेली आहे. त्यामुळेच ह्या जीव घेण्या रस्त्या वरून प्रवास करणे विद्यार्थी,रुग्ण व गोरगरीब आबालवृद्धांचे हाल आणखीनच वाढले आहेत.
तसेच या परिसरातील खेड्यापाड्यांसाठी जवळ व मध्यवर्ती असलेली नगरदेवळा शहरातील बाजारपेठ व दवाखाने यांच्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. ते इतर मार्गाने या परिसरातील ग्राहक व रुग्ण हे कजगाव व नागद या गावांकडे वळलेले आहेत. यामुळे या ग्राहक व रुग्ण यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे नेरी, वडगाव, आखतवाडे या भागातील महिला,विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता बनवू नका, पण खडीचे ढिगारे तरी हटवा अशी मागणी या परिसरातील नागरिक व प्रवाशी करीत आहेत. त्यामुळे एक तर लवकरात लवकर रस्त्याचे काम करण्यात यावे किंवा खडीच्या ढिगाऱ्यापासून रस्ता पूर्ववत मुक्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
आखतवाडे येथील प्रवासी उमेश गढरी यांनी निवडणुकीपूर्वी आखातवाडे नेरी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले व त्यावेळी खडीचे मोठमोठे ढिगारे टाकण्यात आले.निवडणूक संपून अनेक महिने झाले तरी सुद्धा या रस्त्याकडे पाहायला कोणीही शासकीय अधिकारी आलेले नाहीत.आता मात्र खडीचे ढिगारे लोकांना त्रासदायक ठरत आहेत.लवकरात लवकर या रस्त्याचं काम करून रस्ता चांगला करावा किंवा खडीच्या डिगऱ्याच्या त्रासापासून लोकांना मुक्त करावे अशी मागणी केली आहे.