काँग्रेस नेत्याने उधळली जी 20 वर स्तुतीसुमने

नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षेखाली राजधानी दिल्लीत दोन दिवसीय जी 20 शिखर परिषद पार पडली. सत्ताधारी पक्षाकडून परिषदेच्या निमित्ताने मोदींनी देशाला जागतिक पातळीवर मोठं स्थान मिळवून दिल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे काँग्रेसकडून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात असलं, तरी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मात्र या परिषदेतून साध्य झालेल्या गोष्टींबद्दल मोदी सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

शशी थरूर म्हणाले की, जी 20 परिषदेतून आपण जे साध्य केलं आहे, ते नक्कीच भारतासाठी मोठं राजनैतिक यश म्हणावं लागेल. कारण हे सर्व नेते भारतात येईपर्यंत याचीच शंका होती की त्यांचं संयुक्त निवेदन तरी निघू शकेल की नाही. रशिया-युक्रेन युद्धाचं समर्थन करणारे व विरोध करणाऱ्यांमध्ये एकमत होणं निव्वळ अशक्य वाटत होतं. पण या मुद्द्यावर गेल्या ९ महिन्यांत अशक्य वाटणारा फॉर्म्युला प्रत्यक्षात मंजूर करून घेण्यात सरकारला यश आलं आहे. हे भारताचं यश म्हणता येईल, असं शशी थरूर म्हणाले.

या परिषदेसाठी विरोधी पक्षांना आमंत्रण न दिल्याचा मुद्दा शशी थरूर यांनी उपस्थित केला. “विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षातील खासदार, वेगवेगळ्या समित्यांमधील विरोधी पक्षांचे सदस्य यापैकी कुणालाच परिषदेतील कोणत्याच कार्यक्रमाचं आमंत्रण नव्हतं. त्यामुळे परिषदेत राजनैतिक पातळीवर जी सर्वसमावेशकता दिसली, ती आपल्या अंतर्गत राजकीय पातळीवर मात्र दिसून आली नाही, अशा शब्दांत शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, शशी थरूर यांनी एएनआयशी बोलताना जी 20 परिषदेसाठीचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं विशेष कौतुक केलं आहे. “मी या दोघांशी बोलतो आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्या दोघांनी जे केलंय, ते भारतासाठी निश्चितच खूप चांगलं आहे. अशा प्रकारची राजनैतिक चर्चा घडवून आणणं हे सोपं काम नाही. त्या दोघांनी यासाठी खूप कष्ट घेतल्याचं दिसतंय, असं शशी थरूर यांनी नमूद केलं.